Kolhapur : राजाराम कारखान्यासाठी २७ पासून रणधुमाळी शक्य Kolhapur Rajaram factory Election Randhumali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Rajaram factory Election

Kolhapur : राजाराम कारखान्यासाठी २७ पासून रणधुमाळी शक्य

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची १३ हजार ५३८ पात्र सभासदांची अंतिम मतदार यादी उद्या (ता. ९) प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदार यादीनंतर पंधरा दिवसांत निवडणूक कार्यक्रम सुरू करावा लागतो. त्यामुळे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास मतदान २३ एप्रिल रोजी होईल.

दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. प्रस्तावातील नाव समजू शकले नाही. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची घोषणा होणार आहे.

जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १२२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याची निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होणार आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक विरूध्द काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यात यानिमित्ताने काट्याची टक्कर पहायला मिळणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना श्री. पाटील यांनी श्री. महाडिक यांची सत्ता असलेला ‘गोकुळ’ ताब्यात घेतला. आता राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने त्याचा फायदा श्री. महाडिक यांना किती होणार, हे या कारखान्याच्या निवडणुकीत समजणार आहे.

मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. आता उत्सुकता आहे ती प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम कधी लागणार याची. त्याची प्रक्रिया प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांत यासंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे.

कारखाना प्रशासनाने १६ हजार ८१५ सभासदांची प्रारूप यादी प्रादेशिक साखर सहसंचाल कार्यालयाकडे दिली होती. यापैकी १३ हजार ५३८ अ वर्ग सभासद तर १२९ संस्था प्रतिनिधी मतदानासाठी पात्र ठरले आहेत. यादीत सुमारे ३४०६ मयत सभासदांची नांवे होती, ती कमी करण्यात आली आहेत.

९८५ सभासदच पात्र

विरोधी गटाने यापुर्वीच्या मतदार यादीतील १८९९ सभासदांवर आक्षेप घेतला होता. त्यापैकी ४८४ त्यावेळीच पात्र ठरले होते तर १४१५ सभासद अपात्र ठरले होते. नव्या कार्यक्रमात अपात्र १४१५ पैकी भादोले (ता. हातकणंगले) या कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ३३७ सभासद कारखान्यानेच कमी केले.

याशिवाय ५९ सभासद यांची सभासद होण्यासाठी आवश्‍यक त्या अटी पूर्ण होत नसल्याने नावे कमी करण्यात आली तर ३३ सभासद अन्य कारणांनी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे कालच्या सुनावणीत पात्र ठरलेल्या सभासदांची संख्या ९८५ होत असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.