Kolhapur : नवजात बाळांसाठी ‘रिलॅक्स प्लॅटफॉर्म’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur

Kolhapur : नवजात बाळांसाठी ‘रिलॅक्स प्लॅटफॉर्म’

कोल्हापूर : नवजात बाळांना दूध पिल्यानंतर झोपवले जाते. त्यामुळे काहीवेळा गुळणी (गॅस्ट्रो इसोफायजल रिप्लेक्स) येते. त्याचा बाळांना त्रास होतो. त्यातून निमोनिया उद्‌भवण्याचा धोका असतो. बहुतांशी बाळांना याचा त्रास होतो. याचा अभ्यास करून काही डॉक्टर आणि अभियंत्यांनी एकत्र येऊन ‘स्मार्ट रिलॅक्स इन प्लॅटफॉर्म’ ही एक प्रकारची खुर्ची बनवली आहे. हा त्यांचा स्टार्टअप असून, त्यांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा २०२२ यामध्ये राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.

बाळ जन्माला आले की त्यानंतर सुमारे वर्षभर ते दुधावर असते. त्यानंतर आहार सुरू होतो. या काळात जर पचनक्रीया व्यवस्थित झाली नाही तर गुळणी येते. सर्वसाधारण हा त्रास कमी अधिक प्रमाणात सर्वच बालकांना होतो. जर का ही गुळणी श्वसन नलिकेत गेली तर निमोनिया होतो. डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. विजय माळी, डॉ. स्नेहल माळी यांनी याचा सखोल अभ्यास केला. मुलांच्या झोपण्याची, बसण्याची स्थिती योग्य नसल्याने दुधाचे किंवा अन्नाचे पचन होत नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुलांचा गुळणी येते.

त्यामुळे बाळ चिडचिड करते. रडते, त्याची झोप पूर्ण होत नाही. यासाठी त्यांनी क्वांटम बायोलॉजीच्या शास्त्राप्रमाणे मुलांच्या झोपण्याची स्थिती (पोझिशन) कशी असली पाहिजे हे शोधले. झोपण्याच्या स्थितीबरोबरच बाळाच्या हालचालीमुळे वेगवेगळे इफेक्टही महत्त्वाचे असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला. त्यानुसार अभियंता सोहिली पाटील यांनी डिझाईन बनवून ‘स्मार्ट रिलॅक्स इन प्लॅटफॉर्म’ तयार केले.

सुमारे पाचशे बाळांवर याची चाचणी करण्यात आली. या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यानंतर बाळांचा गुणळीचा त्रास पूर्णपणे थांबल्याचे दिसून आले. सध्या इचलकरंजी येथे ‘स्मार्ट रिलॅक्स इन प्लॅटफॉर्म’ बनवला जातो. याची किंमत सुमारे अठराशे ते दोन हजार रुपये आहे. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे या स्टार्टअपसाठी सहकार्य लाभले आहे. तसेच हा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजय बागवडे यांनी उपलब्ध करून दिले.

काय आहे ‘स्मार्ट रिलॅक्स इन प्लॅटफॉर्म’?

एक प्रकारची खुर्ची असून, ती तीन पद्धतीने ठेवता येते. या खुर्चीत नवजात बाळ ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला बसवता येते. याची क्षमता १४ किलो वजनाची आहे. दूध पिल्यानंतर बाळ यामध्ये ठेवल्यावर त्याचे दूध हे जठरात राहते. त्यामुळे त्याचे पचन चांगले होऊन गुळणी येत नाही. बाळाला शांत झोप लागते त्याची चिडचिड होत नाही. हे बनवण्यासाठी गुजरातमधून स्प्रिंग पाइप आणली असून ती वजनाला हलकी आहे. प्लॅटफॉर्मला चाके असून ती वाहून नेण्यास सुकर आहे.

वारंवार गुळणी येणे हे बाळांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ‘स्मार्ट रिलॅक्स इन प्लॅटफॉर्म’ मुळे मुलांना योग्य स्थितीमध्ये बसणे, झोपणे शक्य होते. त्यामुळे पचनाची क्रिया चांगली होऊन गुळणीचा त्रास बंद होतो. याच्या यशस्वी चाचण्या आम्ही घेतल्या आहेत.

- डॉ. अभिनंदन पाटील