
कोल्हापूर : सर्वच पातळ्यांवर संभाजीराजेंची कोंडी
कोल्हापूर : पक्षांनी मला पाठिंबा द्यावा; पण त्यांच्या चौकटीत काम करणार नाही, या भूमिकेमुळेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वच पातळ्यांवर कोंडी झाल्याचे चित्र आहे. भाजपसोबतचा त्यांचा अनुभव पाहता अन्य पक्ष त्यांना सहजासहजी पाठिंबा देण्याची शक्यता नाही. तथापि, मराठा समाजाचा असलेला पाठिंबा, त्यातून त्यांची निर्माण झालेली प्रतिमा आणि छत्रपती घराण्याचा वारस म्हणून यावर मार्ग निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्री. संभाजीराजे यांना २०१६ मध्ये भाजपने राष्ट्रपतिनियुक्त खासदारांतून राज्यसभेवर संधी दिली; पण त्यानंतरच्या कोणत्याही निवडणुकीत त्यांनी भाजपला सहकार्य केले नाही. भाजपने संधी देऊनही त्या पक्षाच्या चौकटीत काम करणार नाही, यावर ते ठाम राहिले. ‘मी स्वतंत्र विचाराने काम करणार; पण मला पक्षांनी पाठिंबा द्यावा,’ ही त्यांची भूमिकाच त्यांना अडसर ठरत आहे; पण सध्याचे राजकारण तसे नाही. त्यातही भाजपसोबतचा त्यांचा अनुभव चांगला नसल्याचे अन्य पक्षांच्या नेतृत्वाला माहीत आहे. त्यामुळे भाजप वगळता राज्यात सत्तेवर असलेल्या एकाही पक्षाकडून त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे.
निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘जर-तर’ म्हणत सुरवातीला पाठिंबा दिला; पण नंतर त्यांनीही घूमजाव केले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला शिवसेनेने सहकार्य केले, त्यातून श्री. पवार यांच्यासह फौजिया खान यांचा राज्यसभेचा मार्ग सुकर झाला. त्यावेळीच पुढल्या निवडणुकीत (म्हणजे आताच्या) शिवसेनेला सहकार्य करण्याचा ‘शब्द’ श्री. पवार यांनी दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा प्रश्नच नाही.
काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ जेमतेम आहे, त्यातून त्यांचा एकच उमेदवार विजयी होतो, त्यामुळे त्यांच्याही सहकार्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे केवळ शिवसेनेवर त्यांची राज्यसभेवरील निवड अवलंबून होती; पण तिथेही शिवसेनेने त्यांना पक्षप्रवेशाची अट घातली. शिवसेनेत जायचे तर त्यांच्या चौकटीत काम करावे लागेल, पक्षाच्या प्रचारात सक्रिय राहावे लागेल, पक्षप्रमुखांच्या बैठकांना हजेरी लावावी लागेल. याला संभाजीराजे तयार नाहीत. त्यातून शिवसेनेतून त्यांना मदत मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे.
राज्यसभेचे गणित वेगळे
‘मी मराठा समाजासाठी काम करतो. राज्यभर कार्यकर्ते आहेत, गड-किल्ले संवर्धनात पुढाकार आहे,’ या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी स्वतंत्र संघटनेची स्थापना केली आहे. त्यांचा राज्यातील काही जिल्ह्यांत दबदबा जरूर आहे; पण तेवढ्यावर अपक्ष म्हणून त्यांना अन्य पक्ष पाठिंबा देतील, असे नाही. राज्यसभेचे गणित वेगळे असते.
त्यात एखाद्याला संधी देताना त्याचा पक्षाला किती फायदा होईल, याचेही आराखडे बांधले जातात. संभाजीराजे यांचा भाजपसोबतचा अनुभव आणि त्यांची सध्याची भूमिका पाहता हे शक्य नाही, तरीही या निवडणुकीसाठी अजून ३१ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तोपर्यंत काय घडामोडी घडणार, यावर त्यांचा राज्यसभा प्रवेश अवलंबून आहे.
Web Title: Kolhapur Sambhaji Raje Rajya Sabha Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..