कोल्हापूर : सोनाळीत पुन्हा राडा

तीन पोलिसांसह आठ जखमी; मोर्चावेळी दगडफेक
सोनाळीत पुन्हा राडा
सोनाळीत पुन्हा राडाsakal

बिद्री: सोनाळी ता. कागल येथे आज रात्री नऊच्या सुमारास ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चावेळी अज्ञातांनी मोर्चा व पोलिसांवर तुफानी दगडफेक केली. या वेळी उडालेल्या गोंधळात पाच ग्रामस्थांसह तीन पोलिस अधिकारी जखमी झाले. यानंतर गावात तणाव निर्माण झाला. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधिकारी तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी गावात भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दतहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी आठ महिन्यांपूर्वी सोनाळीतील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा खून झाला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित गावातीलच मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य हा आहे. तो सध्या अटकेत आहे. त्याची पत्नी, भाऊ वसंत, भावजय आणि पुतण्या सोमवारी गावात आले आहेत. त्याविरोधात वरद पाटीलचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आज रात्री साडेआठच्या सुमारास संशयितांच्या घरावर मोर्चा काढला.

मोर्चा वैद्यच्या घराजवळ आला असता अचानक दगडफेक सुरू झाली. यावेळी एकच धावपळ उडाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यात मुरगूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे, पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे, कागलच्या पोलिस उपनिरीक्षक मोनिका खडके जखमी झाले. दगडफेकीत सारिका कृष्णात पाटील, दत्तात्रय रामचंद्र पाटील, शंकर रामचंद्र पाटील, प्रवीण दत्तात्रय पाटील, ज्ञानदेव संभाजी पाटील जखमी झाले आहेत. दरम्यान, या मारामारीनंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने मुरगूड व कागल पोलिस गावात दाखल झाले. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com