
कोल्हापूर : भाविक, पर्यटकांचे अर्थकारणाला बळ
कोल्हापूर - कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर भरलेल्या जोतिबा चैत्र यात्रेत अभूतपूर्व गर्दीने उच्चांक गाठला आणि विविध प्रांतातून आलेल्या असंख्य भाविकांची पावले डोंगराकडे वळली. आज दुसऱ्या दिवशीही रविवार जोतिबाचा वार अशीच श्रद्धा मनी घेऊन भाविकांची रीघ सुरू होती. त्यामुळे जोतिबा डोंगर गर्दी व गुलालाने न्हाऊन निघाला. त्यासोबतच शनिवार व रविवारची साप्ताहिक सुटी व त्याला रजेची जोड देत अनेकांनी देवदर्शनाबरोबर पर्यटनाचाही आनंद घेतला. भाविक व पर्यटकांमुळे शहरासह जिल्ह्यातील प्रेक्षणीयस्थळे गर्दीर्ने फुलून गेली. त्यासोबत येथील अर्थकरणालाही बळ लाभले.
चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर आलेले भाविक रात्री उशिरापर्यंत डोंगरावर सासनकाठी मिरवणुकीत सहभागी झाले. काहीजण सासनकाठी नाचविण्यात दंग झाले तर अाबालवृद्धांनी दगडी कट्ट्यावर, दुकानांच्या दारात उभे राहून ‘चांगभलं’चा चैतन्यदायी जल्लोष मनात साठवला. रात्री मिरवणुकीला झालेल्या गर्दीत रेटारेटीत अनेकांच्या पायातील चप्पल निसटल्या व त्याचे ढीग पसरले. गुलालाचे थरांवर थर पडताना जोतिबा डोंगरही गुलाबी झाला. रात्री बारानंतर भाविक डोंगरावरून परतू लागले, तेवढेच डोंगरावर जाऊ लगाले. आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही रविवार असल्याने अनेक भाविक डोंगरावर दर्शनाला आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही डोंगरावर गर्दी होती. डोंगर मार्गावर चारचाकी वाहाने, मोटारसायकल, खासगी वाहनांची गर्दी होती.
काहीजण डोंगर घाट उतरून कोल्हापुरात शनिवारी रात्रीच्या मुक्कामाला आले. यात्री निवास, हॉटेल, लॉजमध्ये मुक्काम केला. त्यामुळे बिंदू चौक, मंदिर परिसरातील यात्री निवास, हॉटेलमध्ये रूम मिळणेही मुश्कील झाले. सकाळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली. भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिर, अंबाबाई मंदिर भाविकांची गर्दी होती. सकाळी अनेकांनी रंकाळा तलाव पाहिला तसेच शहरातील विविध खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉल्स व हॉटेलमध्येही चहानाष्ट्याला गर्दी केली. जवळपास २० हजारांवर भाविक दोन दिवसात कोल्हापुरात येऊन गेले. यातील निम्म्या लोकांनी कोल्हापुरात मिळेल त्या जागी मुक्काम केला तर काहीजण दिवसभर कोल्हापूर बघून रात्री जोतिबा डोंगराकडे रवाना झाले. पंचगंगा नदी घाटावर शिवाजी चौक मंडळ, जोतिबा डोंगरावर सहजसेवा ट्रस्टतर्फे याशिवाय रेल्वेस्थानकावरही मोफत अन्नछत्राचा लाभ भाविकांना देण्यात आला. आज दिवसभर येथेही गर्दी होती. या साऱ्यातून कोल्हापूरच्या अर्थकारणाला गती लाभली.
खरेदीचा मनसोक्त आनंद
सुटीचा आनंद घेण्यासाठी नवे पर्यटकही कोल्हापुरात आले आहेत. त्यांनीही पूजा साहित्य खरेदी करण्यापासून दागदागिने ते कोल्हापुरी चप्पल खरेदीचा आनंद मनसोक्त घेतला. दुपारनंतर अनेकजण कणेरी मठ तसेच पन्हाळा पाहण्यासाठी गेले. शहरातील विविध मार्गावर खासगी चारचाकी वाहनांची गर्दी होती. काहींनी रविवारच्या सुटीचा दिवस बघून कोकण दर्शनाला प्राधान्य दिले. दुपारनंतर बहुतेकजन शिवाजी विद्यापीठ महामार्गावरून गडहिंग्लज, आजरामार्गे सावंतवाडी, मालवण किंवा गोव्याकडे रवाना झाले.
एसटीच्या १७५ गाड्यांची सेवा
एसटी महामंडळाच्या १७५ गाड्यांनी कोल्हापूर ते जोतिबा डोंगर प्रवासी सेवा दिली. जवळपास ३० हजारांहून अधिक भाविकांचा जोतिबा प्रवास घडविला.
Web Title: Kolhapur The Financial Strength Of The Devout And Tourists
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..