कोल्हापूर : UPI वापरताय मग तर सावधगिरी अत्यावश्‍यकच

आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार प्राथमिक माहिती गरजेची
upi online payment
upi online paymentsakal

कोल्हापूर: यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारामध्ये सुलभता आली. जलद आणि पारदर्शक व्यवहार वाढले असले तरीही धोका वाढला आहे. अनेक भूलथापा आणि बक्षिसांचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सतर्कता न बाळगता यूपीआयचा वापर करणाऱ्यांना सावध राहणे गरजेचे आहे.

पैशाची देवाण-घेवाण करण्यापासून ते भाजी ते कार, घर असे काहीही खरेदी करण्यासाठी यूपीआयचा वापर सहज झाला आहे. मोबाईल आणि बँक खाते असणारा प्रत्येकजण यूपीआयशी जोडला जातो. ही सुलभता धोक्याकडे नेणारी असल्याने फसवणूक करणाऱ्यांकड़ून रोज नवनवीन पद्धतींचा अवलंब केला जात आहे. हे ॲप वापरताना काही प्राथमिक मात्र अत्यावश्यक माहिती असणे आवश्यक आहे. पैसे मिळविण्यासाठी यूपीआय पिन टाकणे आवश्यक नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यूपीआय पिन फक्त खात्यातून पैसे पाठवण्यासाठी किंवा तुम्हाला कोणालाही पैसे पाठवायचे असतील तेव्हाच वापरला जातो. म्हणजेच यूपीआय पिन वापरून खात्यातून पैसे कापले जातात. पैसे खात्यात येत नाहीत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

ॲप अपडेट ठेवा

जेव्हा जेव्हा असे अपग्रेड उपलब्ध असतील तेव्हा यूपीआय ॲप अपडेट्‌स इन्स्टॉल केले पाहिजेत. अपग्रेडमध्ये सुरक्षा अपडेट्‌स समाविष्ट आहेत, जी तुमचा ॲप वापरण्यासाठी अधिक सुरक्षित बनवतात.

फसवणुकीचा नवीन प्रकार

यूपीआय ॲप्लिकेशनसारखे डुप्लिकेट ॲप्लिकेशन तयार केले आहेत. जे ॲप स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत, या ॲप्लिकेशन्सचा वापर करून सायबर गुन्हेगार डिजिटल व्यवहारातून तुमच्या खात्यावर पैसे पाठवल्याचे भासवतात. वास्तवात हे पैसे खात्यामध्ये जमा होत नाहीत. हे ॲप प्रँक पेमेंट ॲप, मनी प्रँक प्रो, पेटीएम स्पूफ आणि स्क्रीन शॉट जनरेटरच्या नावाने लोकप्रिय आहेत. सायबर गुन्हेगार तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी या प्रँक अप्लिकेशन्ससह तुमचा क्युआर कोड स्कॅन करतात. त्यानंतर तुम्हाला पैसे पाठवतात. काही सेकंदांत तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे दिसतात. स्क्रीन शॉट तुम्हाला दाखवतात; परंतु खात्यात पैसे येत नाहीत. अनेक दुकानदार स्क्रीन शॉट बघून ग्राहकांवर विश्वास ठेवतात; परंतु पैसे आल्याचा मेसेज न आल्याने खाते तपासल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

स्क्रीन शेअरिंग, रेकॉर्डिंग ॲप्लिकेशन धोकादायक

स्क्रीन शेअरिंग ॲप्सना यूपीआय ॲप्लिकेशनसाठी परवानगी देऊ नका. अशा ॲप्समुळे डाटा लिक होण्याची आणि ते तुमच्या पासवर्ड आणि ओटीपीसाठी रेकॉर्ड आणि शेअर होण्याची शक्यता बळावते. मोबाईल नंबरपेक्षा यूपीआय आयडीवर व्यवहार करा. तुम्ही दूर पैसे पाठवत असाल तर समोरील व्यक्तीचा यूपीआय आयडी किंवा क्युआर कोड विचारा. मोबाईल नंबर वापरून पैसे पाठवताना चुकीचा नंबर टाईप केला जाण्याची शक्‍यता आहे. खबरदारी म्हणून तुम्ही एकूण रक्कम पाठवण्यापूर्वी लाभार्थीसोबतच्या व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी कमी पैसे पाठवून पडताळणी करा.

यूपीआय ॲप हे अधिक सुरक्षित व्यवहारासाठी बनवले आहेत. ते हाताळताना वापरकर्त्याकडून होणाऱ्या चुकांमुळे नुकसान होते. फसवणूक करणारा अधिक प्रलोभने आणि आमिष दाखवतो. त्यांना बळी न पडणे आणि शंका आल्यास पडताळणी गरजेचे आहे.

ओमकार तोडकर,ॲप डेव्हलपर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com