कोल्हापूर : कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा

कोल्हापूर : कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा

कोल्हापूर: कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. ‘सकाळ’ने अशा गुणवंत महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले आहे. अशा सर्वच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा, असे गौरवोद्‌गार मधुरा बाचल यांनी काढले. त्यांच्या हस्ते आज ‘सकाळ’च्या ‘वूमन इन्फ्ल्यूएन्सर ॲवॉर्ड’चे वितरण करण्यात आले. मधुरा बाचल या ‘मधुराज रेसीपी’ हे प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल चालवतात. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सुरुवातीला ऋद्रम बँडच्या शुभम साळोखे आणि रोहीत सुतार यांनी गिटार आणि ड्रमच्या साथीने बहारदार गाणी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘सकाळ माध्यम समूहाने पहिल्यापासूनच बातमीदारीच्या पलीकडील आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. समाजात जे चांगले आहे ते वेचावे आणि लोकांसमोर मांडावे याच भावनेतून या पुरस्कारांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ’ रिलीफ फंडाची सुरुवातही सामाजिक उत्तरदायित्वातून झाली. या फंडाच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूरसह राज्यभरात महापूर आणि दुष्काळाच्या काळात लोकांना मदत केली गेली. काश्मीरमध्ये अतिशय दुर्गम भागात शाळा सुरू करून माणूस जोडण्याचे काम ‘सकाळ’ने केले. ‘पंचगंगा वाचवूया’ या अभियानात हजारो नागरिकांना सहभागी करून नदी प्रदूषणमुक्त करण्याची लोकचळवळ ‘सकाळ’ने सुरू केली. पुणे, नागपूर, नाशिक येथे अशीच लोकचळवळ नदी वाचवण्यासाठी सुरू करणार आहोत. ‘सकाळ वूमन इन्फ्ल्यूएन्सर’ ॲवॉर्डसाठी आपली निवड करताना काही निकष लावण्यात आले. त्यातून तुमची निवड केली गेली यामुळे आपले कर्तृत्व सिद्ध झाले आहे. या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे.’’

मधुरा बाचल म्हणाल्या, ‘‘संवेदनशीलता हा महिलांचा एक गुण आहे. यामुळे त्या कल्पक असतात. कुटुंबाचे पालन पोषण असो किंवा एखादा व्यवसाय असो समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्या मात करतात. अशा संकटांना मागे टाकून व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा. ‘सकाळ’ने नेहमीच महिलांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले. त्याचा महिलांना मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. मी ‘सकाळ’ची लहानपणापासूनची वाचक आहे. आज या सोहळ्यामुळे हा ऋणानुबंध आणखी वृद्धिंगत झाला.’’

आपल्या ‘मधुराज रेसिपी’ या यूट्यूब चॅनेलबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रीयन पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक आहेत. त्यामुळेच ते आवडीने खाल्ले जातात. या मराठी पदार्थांना जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने हे यूट्यूब चॅनेल सुरू केले. सुरुवातीला कॅमेऱ्याची सवय नसल्याने मनात धाकधूक होती. कालांतराने याची सवय झाली. आज मधुराज रेसिपी हे चॅनेल सर्वत्र पाहिले जाते.’’

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार म्हणाल्या,‘‘समाजात विविध क्षेत्रांत महिलांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वापुढे आसमानही ठेंगणे आहे. ‘सकाळ’ने दिलेल्या या पुरस्कारामुळे या महिलांना पुढचे पाऊल टाकण्याचे बळ मिळणार आहे. हा गुणगौरव सोहळा कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहील.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या बेहेरे यांनी केले. ‘सकाळ’च्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी आभार मानले. यावेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, स्मार्ट सोबती पुरवणीच्या संपादिका सुरेखा पवार, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांगली जिल्ह्यातील पुरस्कारार्थी

डॉ. सुनीता शंकर माळी (उपप्राचार्य, कन्या महाविद्यालय, मिरज), स्नेहल संदीप खरे (गायत्री केटरिंग सर्व्हिसेस, मिरज), दीपा सुभाषचंद्र पाटील (संचालिका, श्री. निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्था, संख, जत), मंगल रावसाहेब पाटील (सरपंच, ग्रामपंचायत, संख), सज्जला तुषार मोरे (प्राचार्य, शाहू प्राथनिक विद्यामंदिर, विटा), ज्योती अरविंद देवकर (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, सांगली), संगीता संजीव काळे (संस्थापक संचालिका, स्कायवे हेअर अँड मेकअप अकादमी प्रा. लि.) मधुमता दयाधन सोनवणे (सामाजिक कार्यकर्त्या, मिरज), रिना महेश चव्हाण (सिल्हौट आर्किटेक्ट), नम्रता अभिनंदन पाटील (संस्थापक, बिइंग यू लाइफ कोचिंग), रश्मी आबासाहेब शिंदे (सरपंच, ग्रामपंचायत म्हैसाळ, मिरज), बेबीनंदा सुरेश भंडारे (सेवानिवृत्त शिक्षिका, इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला, विटा), अश्विनी योगेश राडे (संचालिका, सिद्धी अभियांत्रिकी, पलूस) कमल राजेंद्र पाटील (संचालिका, चौगुले टूर अँड ट्रॅव्हल्स, इस्लामपूर), डॉ. कृष्णा नितीन जाधव (आनंद हॉस्पिटल, शिराळा), शर्मिष्ठा संजय पोळ (आगार व्यवस्थापक, इस्लामपूर), ज्योती महेश कांबळे (अंगणवाडी सेविका, अब्दुललाट, शिरोळ), मनीषा सचिन शितोळे (माजी नगराध्यक्षा, विटा नगरपरिषद), शिला समीर गायकवाड-भासर (सामाजिक कार्यकर्त्या, आष्टा), ॲड. श्रुती श्रीनिवास भोसले (आर्थिक कर सल्लागार), मीनाक्षी अमृतराव नाईक-निंबाळकर (सचिव, डी. आर. नाईक-निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, विटा), उमा दीपर सारडा (संचालिका, सारडा ब्रदर्स, सांगली), अनिता कपिल ओसवाल (सामाजिक कार्यकर्त्या, इस्लामपूर), सुजाता विनय कुलकर्णी (एस. व्ही. क्रिएशन, सांगली), स्मिता चेतन माने (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर दक्षिण), निकिता संजीव पाटील (संस्थापक, गेट गोइंग हॉलिडेज), वर्षाराणी विनोद मोहिते (संचालिका, मुक्तांगम प्ले-स्कूल आणि ॲक्टिव्हिटी सेंटर, इस्लामपूर), साधना राजाराम पाटील (यशवंत व्यसनमुक्ती केंद्र, शिराळा).

Web Title: Kolhapur Woman Power Tribute Capable

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top