
Kolhapur News : कसबा बावड्यातील दोघांकडून सोलापुरातील महिलेला गंडा
कोल्हापूर : ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रेलर बनविण्यासाठी झालेल्या व्यवहारातून १ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल कसबा बावड्यातील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सफाई ॲग्रो इंजिनिअरिंगचे मालक विजय पवार व रुपेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सोलापूर जिल्ह्यातील आशा नागनाथ घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, कसबा बावडा येथे सफाई ॲग्रो इंजिनिअरिंगमध्ये फिर्यादीचे पती नागनाथ बंडा घाडगे (रा. मंढेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी २०२१ मध्ये ऊस वाहतुकीसाठी ट्रेलर बनविण्यासाठी पाच लाख ६५ हजार रुपयांना व्यवहार ठरला होता.
त्यापैकी ॲडव्हान्स ७५ हजार रुपये रोख, ऑनलाईन ५० हजार रुपये आणि ४८ हजार रुपये असे एकूण १ लाख ७३ हजार रुपये दिले होते. परंतु, फिर्यादीच्या पतीचे निधन झाल्यानंतर संशयित आरोपी पवार आणि त्याचे नातेवाईक रुपेश पाटील यांनी ट्रेलर न देता तो परस्पर विकला. ॲडव्हान्सही परत केली नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली.