अखेर विधान परिषदेचं ठरलं : अमल महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब : Amal Mahadik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amal mahadik

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उमेदवारांची घोषणा केली.

अखेर विधान परिषदेचं ठरलं : अमल महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने काल रात्री उशिरा पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यात कोल्हापूर येथील जागेसाठी अमल महाडिक यांची घोषणा करण्यात आली. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन नागपूरमधून करण्यात आले असून, भाजपवासी झालेले माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांना धुळे-नंदूरबार मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उमेदवारांची घोषणा केली. कर्नाटकात वीस उमेदवारांची घोषणा झाली. त्यापैकी बेळगावमधून महांतेश कवटगीमठ, तर गुलबर्गा येथून बी. जी. पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यातील पाच जागांवरील भाजप उमेदवार असे : मुंबई ः राजहंस सिंह, अकोला बुलढाणा वाशिम ः वसंत खंडेलवाल, नागपूर ः चंद्रशेखर बावनकुळे, धुळे-नंदुरबार ः अमरिशभाई पटेल आणि कोल्हापूर ः अमल महाडिक.

हेही वाचा: आम्ही गरजणारे नव्हे बरसणारेच: विधान परिषदेत महाडिकच विजयी होणार

बावनकुळे यांचे तिकीट भाजपच्या राज्य नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत कापले होते. बावनकुळे यांची ओळख विदर्भातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अशी आहे. २०१५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांना ऊर्जा हे महत्त्वाचे खाते मिळाले. नंतर निवडणुकीच्या काळात ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला. तरी बावनकुळे यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल जाहीरपणे न बोलण्याचा संयम दाखविला. त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. ते दिल्लीत अनेकदा गडकरी यांची भेट घेण्यास येत असतात. पटेल हे धुळे-नंदूरबार पट्ट्यातील वजनदार नेते आहेत. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ते राज्याचे शिक्षणमंत्री होते. त्यांच्या रूपाने भाजपला विधान परिषदेत एक अनुभवी चेहरा मिळणार आहे.

loading image
go to top