
‘बिद्री’बाबत सहकार आयुक्त काय निर्णय घेतात? याकडे कार्यक्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Eknath Shinde : आमदार आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं 'ते' पत्र व्हायरल; राजकीय चर्चांना उधाण
बिद्री : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची (Dudhganga Vedganga Sugar Factory Election) होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक येत्या पावसाळ्यानंतर (३० सप्टेंबर) घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मागणी करणारे आमदार प्रकाश आबिटकर यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या पत्रानुसार मुख्यमंत्र्यांनी सहकार आयुक्त, पुणे यांच्याकडे शिफारस केली आहे. त्यामुळे 'बिद्री'ची निवडणूक आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. आमदार आबिटकर (Prakash Abitkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बिद्रीच्या कार्यक्षेत्रात ७ जूनपासून पावसाला सुरुवात होते. या कारखान्याच्या एकूण सभासदांपैकी सुमारे ४० हजार सभासद हे राधानगरी, भुदरगड या दोन तालुक्यांतील आहेत.
पावसाळ्यात या तालुक्यांत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे महापूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम राबविणे सर्वांच्याच गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे बिद्रीची निवडणूक (Bidri Election) पावसाळ्यानंतर (३० सप्टेंबर) घ्यावी.
अशा प्रकारचे आदेश संबंधितांना निर्गमित करावेत. दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार आयुक्त, पुणे यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.
चेंडू सहकार आयुक्तांच्या कोर्टात
राज्यात अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मग पूर परिस्थितीचे कारण सांगून फक्त ‘बिद्री’चीच निवडणूक पुढे ढकलणार की संपूर्ण राज्यात हा नियम लागू होणार? ‘बिद्री’बाबत सहकार आयुक्त काय निर्णय घेतात? याकडे कार्यक्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.