
अपघातात सराफ व्यवसायिकाचा मृत्यू
कोल्हापूर : मोटारीचा ताबा सुटल्याने ती रुग्णालयाच्या शेडमध्ये घुसून झालेल्या अपघातात सराफ व्यवसायिकांचा मृत्यू झाला. अमित रमेश दड्डीकर (वय ३८, रा. विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर) असे त्यांचे नाव आहे. आयसोलेशन रिंगरोडवर मध्यरात्री ही घटना घडली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की अमित दड्डीकर हे सरफा व्यवसायिक आहेत. त्यांचे दैवज्ञ बोर्डींग परिसरात दुकान आहे. ते क्रिकेट खेळाडू होते. काल रात्री ते मोटारीतून कामानिमित्त बाहेर गेले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ते हॉकी स्टेडियम चौक ते शेंडा पार्क चौक मार्गे घरी जात होते. यावेळी त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला. तशी मोटार रस्त्याकडेला असणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला धडकून ती येथील ऑक्सिजन शेडमध्ये घुसली. या अपघातात दड्डीकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णावाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातात मोटारीसह संरक्षक भिंतीसह शेडचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ प्रायोजित ‘रोटरी प्रिमिअम लिग क्रिकेट स्पर्धेत’ ते पास्ट रोट्रॅक्ट युनाईटेड या संघाकडून गेली सात वर्षे खेळत होते. त्यांनी स्पर्धेत अनेकदा सामनावीरचा बहुमानही मानही मिळवला होता. या दुर्घटनेने एक चांगला खेळाडू गमावल्याची खंत क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त होत होती.