हिंमत असेल तर उद्या निवडणूक घेऊन दाखवा; NCP आमदाराचं भाजपला ओपन चॅलेंज I Kolhapur Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde News

पक्ष स्थापनेनंतर काही काळ पडझड झाली. पण ठाकरे गट, कॉंग्रेस सोबत काम करून महाविकास आघाडीचे दहा आमदार तसेच दोन खासदारही निवडून आणू.

Kolhapur Politics : हिंमत असेल तर उद्या निवडणूक घेऊन दाखवा; NCP आमदाराचं भाजपला ओपन चॅलेंज

कोल्हापूर : ‘देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर हुकूमशाही विरोधातील लढाई सुरू करून २०२४ च्या निवडणुकीत विजयाचा इतिहास घडवूया. त्यासाठी बूथ कमिट्या बळकट करा,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्राचे विभागीय बूथप्रमुख, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केले.

सरकारबाबत जनतेत नाराजी आहे, हिंमत असेल तर उद्या निवडणूक घेऊन दाखवावी. प्रचार न करताही जनता सरकार उलथवून टाकेल’, असेही त्यांनी सांगितले. मार्केटयार्डमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आज बूथ कमिटी आढावा बैठक माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व आमदारांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार शिंदे म्हणाले, ‘राजकीय स्थित्यंतराच्या या कालावधीत लोकशाहीचा खून पाडला जात आहे. या प्रवृत्तीविरोधातील लढाई जिद्दीने जिंकायची आहे. ही लढाई सोपी नसून माझ्यासह साऱ्यांचीच ही परीक्षा आहे. राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यातील पक्ष नाही हे दाखवून द्या.’

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘पक्षासाठी निरपेक्षवृत्तीने, प्रामाणिकपणे काम केले तर २०२४ मध्ये दोन लोकसभा व दहा विधानसभा मतदारसंघात शंभर टक्के यश मिळवू शकतो.’ जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ‘चौकात बसून मुंबई, राज्यातील चर्चा करत बसण्यापेक्षा बूथ कमिटीचे काम करा. पक्ष स्थापनेनंतर काही काळ पडझड झाली. पण ठाकरे गट, कॉंग्रेस सोबत काम करून महाविकास आघाडीचे दहा आमदार तसेच दोन खासदारही निवडून आणू. त्यासाठी पक्षाला आमदारकीच्या चार जागा मिळाव्यात.’

या वेळी आमदार अरूण लाड व सारंग पाटील यांनीही मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार राजेश पाटील, व्ही. बी. पाटील, नाविद मुश्रीफ, राजीव आवळे, भैय्या माने, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.