कोल्हापूर पोटनिवडणुकीत प्रथमच नगरसेवक होणार आमदार

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी गुरुवारपासून (ता. १७) सुरू झाली. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे.
Kolhapur North Byelection
Kolhapur North ByelectionSakal
Summary

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी गुरुवारपासून (ता. १७) सुरू झाली. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या (Kolhapur North Vidhansabha Constituency) पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून (Congress) श्रीमती जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्‍चित आहे, तर भाजपकडून (BJP) सत्यजित कदम यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. या दोन उमेदवारांतच मुख्य लढत असणार आहे. या दोघांतील कोणाचाही विजय झाला तर महापालिकेचा पहिला नगरसेवक (Corporator) आमदार (MLA) होणार आहे.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी गुरुवारपासून (ता. १७) सुरू झाली. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी ठाम ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

काँग्रेसकडून दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्‍चित आहे. भाजपकडून सहा इच्छुक होते, यापैकी कदम व माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची नावे पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवली आहेत. त्यातही कदम यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस पाटील यांच्यासह राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय बोर्डाकडे केली आहे. त्यामुळे ‘उत्तर’च्या मैदानात हे दोन माजी नगरसेवक रिंगणात असणार आहेत.

जुन्या कोल्हापूर शहर व आताच्या ‘उत्तर’मधून आतापर्यंत एकही नगरसेवक आमदार म्हणून निवडून गेलेला नाही. महापालिकेचा महापौर झाल्यानंतर अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडतात. त्यातून माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे व आर. के. पोवार यांनी १९९९ ची विधानसभा एकमेकांविरोधात लढवली होती. ॲड. आडगुळे काँग्रेसचे, तर पोवार राष्ट्रवादीचे उमेदवार होते. या दोघांचाही पराभव झाला. या दोघांचा अपवाद वगळता नगरसेवक किंवा महापौरांनी विधानसभेचा नाद केला नाही. काँग्रेसच्या उमेदवार जाधव ह्या २०१५ मध्ये भाजपच्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या, तर कदम हे ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक आहेत. पूर्वी एकदा कदम काँग्रेसच्या चिन्हावर महापालिकेत आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार कै. जाधव यांनीच काँग्रेसची उमेदवारी मिळवली, त्यामुळे श्रीमती जाधव याच पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवारीच्या प्रबळ दावेदार ठरल्या आहेत. या मतदारसंघात या दोनच उमेदवारांत प्रमुख लढत असेल. त्यामुळे या दोघांपैकी कोणीही विजयी झाले तर त्यांच्या रूपाने महापालिकेचा पहिला नगरसेवक विधानसभेत आमदार म्हणून जाणार एवढे निश्‍चित.

डॉ. डी. वाय. पाटील पन्हाळ्यातून आमदार

शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील हे कोल्हापूर नगरपालिका असताना नगरसेवक होते. पण, त्यांनी नंतर त्यावेळच्या पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. डॉ. पाटील त्यावेळी नव काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांना ३६ हजार ९५३ मते मिळाली, तर २४ हजार ७०९ मतांनी ते विजयी झाले होते.

थेट विधानसभेतच...

कोल्हापूर शहर मतदारसंघातून नगरपालिका किंवा महापालिकेची निवडणूक न लढवता थेट आमदार झालेल्यांत कै. रवींद्र सबनीस (१९७८), लालासाहेब यादव (१९८०), कै. प्रा. डॉ. एन. डी. पाटील (१९८५), कै. दिलीप देसाई (१९९०), सुरेश साळोखे (१९९५, १९९९), मालोजीराजे छत्रपती (२००४), राजेश क्षीरसागर (२००९,२०१४), कै. चंद्रकांत जाधव (२०१९) यांचा समावेश आहे.

फाळके थेट लोकसभेच्या रिंगणात

शहराच्या पाणीप्रश्‍नावरून थेट महापौर पदाचा राजीनामा दिलेले माजी महापौर रामचंद्र फाळके यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते, त्यांना दुसऱ्या क्रमांकांची ७५ हजार १७७ मते मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com