दोनवेळच्या तीव्र संघर्षानंतर आता बिनविरोध

विकास सोसायटी गट; आमदार सतेज पाटील यांचा जिल्हा बँकेतील प्रवास
satej patil
satej patilsakal

कोल्हापूर : विधान परिषद बिनविरोध जिंकलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांची जिल्हा बँकेवरील निवडही बिनविरोध निश्‍चित झाली आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत त्यांना संघर्ष करावा लागला होता. त्याची झळ अनेकांना बसली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा इतिहास पाहता वीस वर्षांत असा संघर्ष झालेला नाही.

श्री. पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक सर्वप्रथम २००१ मध्ये लढवली. त्या वेळी त्यांनी गगनबावडा तालुका विकास सोसायटीत गटातूनच नशीब अजमावले होते. त्यांच्या विरोधात विद्यमान संचालक पी. जी. शिंदे होते. शिंदे-पाटील यांच्यात अटीतटीची निवडणूक झाली. त्यांना मानणाऱ्या ठरावदारांना तब्बल तीन महिने सहलीवर पाठवले होते. ठराव खरा की खोटा यावरून काही संस्थांचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता; पण श्री. पाटील यांनी अवघ्या दोन-चार मतांनी बाजी मारत जिल्हा बँकेत प्रवेश केला.

दुसरी निवडणूक त्यांनी २००६ मध्ये व्यक्ती सभासद गटातून लढवली. यातही त्यांचा संघर्ष राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी आमदार अशोक जांभळे यांच्याशी झाला. त्यावेळी व्यक्ती सभासदांची संख्या होती ५०० च्या आसपास; पण हयात सभासद फारच कमी होते. त्यामुळे या गटातूनही एका-एका मतांसाठी संघर्ष करावा लागला. माजी आमदार महादेवराव महाडिक हे श्री. पाटील यांच्या बाजूने तर माजी मंत्री (कै.) दिग्विजय खानविलकर श्री. जांभळे यांच्या बाजूने होते. त्यातून प्रचंड संघर्ष मतदानादिवशी स. म. लोहिया हायस्कूलच्या पटांगणावर पाहायला मिळाला. एका मतांसाठी तर तत्कालिन पोलिस उपअधीक्षक सुधाकर पठारे यांनी पाटील यांच्या स्वीय्य सहायकालाच ताब्यात घेतले. याचा राग आल्याने श्री. पाटील यांनी स्वतः पोलिस गाडीत चढून स्वीय्य सहाय्यकाला खाली घेतले. यावरून तर पठारे-पाटील यांच्यात हमरीतुमरी झाली; पण निकालात मात्र श्री. पाटील यांनी जांभळे यांचा पराभव केला.

२००६ मध्ये श्री. शिंदे गगनबावडा तालुक्यातून विजयी झाले होते. बँकेवर २००९ मध्ये प्रशासक नियुक्तीची कारवाई झाली. तत्पूर्वीच बँकेतून विनातारण दिलेल्या ११७ कोटीच्या कर्जप्रकरणी तत्कालिन संचालकांवर प्रत्येकी तीन ते चार कोटींची जबाबदारी निश्‍चित झाली. त्यातून २०१५ ची निवडणूक श्री. पाटील यांनी न लढवण्याचा निर्णय घेतल्याने श्री. शिंदे विजयी झाले. त्यावेळीही श्री. शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. काही संस्थांच्या ठरावाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला. उच्च न्यायालयात या प्रकरणाचे निकाल श्री. शिंदे यांच्या बाजूने लागले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच बँकेची निवडणूक लागली; पण श्री. पाटील यांनी आपल्याऐवजी मानसिंग पाटील यांना रिंगणात उतरवले. बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला; पण याचिकेवरील निकाल लागेपर्यंत हा निकाल राखून ठेवण्याचे आदेश दिले होते. बँकेच्या निकालानंतर तब्बल वर्षभरानंतर निकाल लागला आणि त्यात श्री. शिंदे यांनी बाजी मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com