विसर्जित शाडूचा पुन्हा मूर्तींसाठी वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur news

Kolhapur ; विसर्जित शाडूचा पुन्हा मूर्तींसाठी वापर

कोल्हापूर : शाडूच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने कुंडात विसर्जन झाले. पाण्यात विरघळलेल्या शाडूचे काय?, असा प्रश्न होता. थांग-ता असोसिएशनने कृतिशील पावले उचलत ‘एक पाऊल निसर्गासाठी’ उपक्रम आखला आणि कुंडात विरघळलेली माती पुन्हा कुंभार बांधवांना देण्यास सुरुवात केली आहे.

परंपरेप्रमाणे शाडूच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणारी अनेक कुटुंबे शहर परिसरात आहेत. त्यांच्याकडून भक्तिभावाने मूर्तींचे पूजन करून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले जाते. भविष्यात शाडूची टंचाई भासू नये, यासाठी थांग ता असोसिएशनने पाण्यात विरघळलेला शाडू पुन्हा मूर्तीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्योतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्सने सहकार्य करत साकोली कॉर्नर व शाहूपुरी महादेव मंदिर परिसरात विसर्जन कुंड ठेवले. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडूच्या मूर्तींचे स्वतंत्रपणे विसर्जन करण्याचे भक्तांना आवाहन केले.

यंदा घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या १५६ मूर्तींचे काहिलीत विसर्जन केले. विसर्जन कुंडातील शाडू माती थांग ता असोसिएशनकडे जमा केली. गतवर्षी ७९ मूर्तींचा शाडू कुंभार बांधवांना देण्यात आला होता. यंदा कुंडात मूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

असोसिएशनचे प्रशिक्षक सतीश वडणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत पाटील, करण शिंदे, गणेश मुठे, ज्योतिरादित्य साळोखे, शोन शिंदे, ऋषिकेश पाटील, रोनक साळोखे, शुभम राबाडे, मंजित मोरे, राहुल काडणे, शुभम सावंत, संकेत साळोखे यांनी उपक्रमात सहभाग घेतला. दृष्टिक्षेपात शाडूची सुमारे पंचेचाळीस पोती शाडू नव्या मूर्तीसाठी पुन्हा वापरणार, सुमारे २५ ते ३० किलोचे शाडूचे एक पोते १९० रुपयांना त्यातून प्रत्येकी एक फुटाच्या चार मूर्ती होतात विसर्जित शाडूत कापूस असल्याने तो मूर्तीच्या अंतरंगात मजबुतीसाठी, तर नवा शाडू मूर्तीच्या बाह्य रूपासाठी उपयोगात आणला जातो.

शाडू मिळविण्यासाठी कुंभार बांधवांना धावपळ करावी लागते. त्यांचे कष्ट कमी व्हावेत, यासाठी विसर्जित मूर्तीचा शाडू पुन्हा मिळवला जात आहे. त्यातून पुन्हा मूर्ती बनविल्या जातील. ज्यांना शाडू हवा असेल त्यांनी शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरात थांग ता असोसिएशनशी संपर्क साधावा.

- सतीश वडणगेकर

Web Title: One Step Nature Initiative Re Use Dissolved Shadu Steps Thang Ta Association

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..