अटकेतील 'पॉझिटिव्ह' ला दाखल करण्यासाठी पोलिस फिरले रात्रभर

चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या जीवाशीच झाला खेळ
अटकेतील 'पॉझिटिव्ह' ला दाखल करण्यासाठी पोलिस फिरले रात्रभर

कोल्हापूर : एका गुन्ह्यात त्याला संशयित म्हणून अटक झाली. छातीत वेदना होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. चार पोलिसांनी त्याला १०८ रुग्णवाहिकेतून पुण्यात दाखल केले. तेथील सर्व परिस्थिती पाहता त्याने तेथे उपचारास नकार दिला. त्यामुळे पुन्हा त्याला कोल्हापुरात आणले. सबजेलमध्ये नेण्यापूर्वी त्याची चाचणी केली, तेव्हा तो कोरोनाबाधित आढळला आणि तेथूनच पुढे पोलिसांच्या जीवाशी खेळ सुरू झाला. हा सारा प्रकार सोमवार (१९)पासून काल (२०)च्या दरम्यान घडला.

कोल्हापुरातून पुण्याच्या रुग्णालयात गेल्यावर तेथील अवस्था पाहून संशयित आणि पोलिसही चक्रावून गेले. त्याने प्राथमिक वगळता पुढील उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा त्याला कोल्हापुरात आणायचे होते. अखेर वरिष्ठांशी संपर्क साधल्यावर कोल्हापुरातून स्वतंत्र पोलिस गाडी पाठवून रात्रीत कोल्हापुरात आणण्यात आले. दरम्यानच्या काळात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे ‘सीपीआर’मध्ये रात्रीत त्याची वैद्यकीय तपासणी करून कारागृहात दाखल करायचे होते. ‘सीपीआर’मध्ये चाचणी झाली. ती पॉझिटिव्ह आली. तरीही त्याला तेथे थांबवून घेतले नाही. ‘पॉझिटिव्ह’ सोबत असल्याची माहिती असूनही पोलिसांनी त्याला दाखल करण्यासाठी धडपड सुरू केली.

न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणून पोलिसांनी त्याला थेट सबजेलमध्ये नेले. तेथेही नकार मिळाला. तेथून त्याला पोलिसांच्याच गाडीतूनच आयटीआय येथील कैद्यांच्या अलगीकरण कक्षात नेले. तेथेही पुन्हा नकारघंटाच वाजली. त्यानंतर पोलिसांनी आयसोलेशन हॉस्पिटल गाठले. तेथेही तोच प्रकार घडला. तेथून पोलिसांनी शिवाजी विद्यापीठाचे ‘डीओटी’ अलगीकरण केंद्र गाठले. मात्र, तेथे एकच व्यक्ती होती. तीही पॉझिटिव्ह. त्यामुळे तेथेही त्याला दाखल करता आले नाही. अखेर पोलिसांनी आपल्याच पोलिस गाडीतून त्याला टाउन हॉल बागेजवळ आणले. रात्रीपासून सुरू असलेला प्रवास पहाटेपर्यंत सुरू होता. त्यामुळे त्याला दाखल करण्याचा आटापिटा पोलिसांनी थांबविला.

पॉझिटिव्ह असलेल्या पोलिस जीपमध्येच पोलिसांनी डुलका काढला. अखेर सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाली आणि रात्रभरातील पोलिसांचीही धावपळ सकाळी दहाच्या सुमारास ‘सीपीआर’मध्ये संपली. आता तेही पॉझिटिव्ह होतील की काय, याची भीती होती. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. पण, त्या पोलिसांच्या जीवाशी खेळ झाला. ‘करवीर’ काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात आता आपण असुरक्षित असल्याची भावना पोलिसांमध्ये निर्माण झाली आहे.

वरिष्ठांचा निर्णय

संशयिताला कोल्हापुरातून पुण्याला १०८ रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. या वेळीही ५० वर्षांहून अधिक वय असलेला पोलिस कर्मचारी त्याच्याबरोबर होता. ही माहिती ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी थेट वरिष्ठांचे घर गाठले. भेट झाली नाही म्हणून घरी परतले. थोड्याच वेळात त्यांना वरिष्ठांचा दूरध्वनी आला. तेव्हा त्यांनी ही माहिती सांगितली. वरिष्ठांनी तातडीने त्यांना कोल्हापुरात बोलविले आणि दुसरा कर्मचारी पाठविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com