esakal | ‘प्रिन्स क्लब खासबाग’ने जपली परंपरा; देखाव्यातून समाज प्रबोधनाचे कार्य
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रिन्स क्लब’ने जपली परंपरा; देखाव्यातून समाज प्रबोधनाचे कार्य

‘प्रिन्स क्लब’ने जपली परंपरा; देखाव्यातून समाज प्रबोधनाचे कार्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर: मंगळवार पेठ खासबाग येथील प्रिन्स क्लबने समाजसेवेची व प्रबोधनाची परंपरा गेली ४५ वर्षे जपली आहे. उत्सवाचा खर्च असो किंवा देखावे असोत सर्वच गोष्टी क्लबने समाजाभिमुख भूमिका घेवून स्वतःचे वेगळेपण जपले आहे. स्त्री शक्ती, व्यसन मुक्ती, स्वच्छता, शिक्षणासह पर्यावरणाचे महत्व समाजाला पटवून देण्याचे प्रयत्न क्लब देखाव्याच्या माध्यमातून अखंडितपणे करत आहे. मूर्ती लाहन पण किर्ती महान, असा हा क्लब दरवर्षीच्या गणेशोत्सवात अबालवृद्धांचे मुख्य आकर्षण बनला आहे.

हेही वाचा: सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

शालेय शिक्षण घेताना अशोक पोवार, अजित ऊर्फ जॉनी पोवार आणि जयवंत सुतार यांना मोठ्या तालीम मंडळाचा गणेशोत्सव, त्यांचे भव्यदिव्य देखावे, मिरवणूकांचे मोठे आकर्षण वाटायचे. त्यांनी खासबाग मैदानातून माती आणून मूर्ती तयार केली. शालेय रंगाच्या सहायाने ती रंगवून त्याची प्रतिष्ठापना केली. इतिहासाच्या पुस्तकांचा आधार घेत छोटा देखावाही सादर केला. यातूनच १९७७ मध्ये प्रिन्स क्लबची सुरवात झाली.

सुरवातीची पाच वर्षे छोट्या कार्यकर्त्यांनी स्वतः मूर्ती बनवली. हळूहळू भागातील छोटी मुले या उत्सवात सहभागी होऊ लागली. बघता बघता हे कार्यकर्ते मोठे झाले. त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजिक उपक्रमातून ‘प्रिन्स क्लब’ने शहरासह जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

क्लबची ‘जाऊळाचा बाल गणपती’ मूर्ती प्रसिद्ध आहे. कार्यकर्त्यांनी १९८१ मध्ये वर्गणी न मागता घरातील वहा पुस्तकांची रद्दी, भंगाराची विक्री करून कुंभारांकडून पहिल्यांदाच मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली. त्यावेळी या मंडळाचे अनुकरण अनेक छोट्या मंडळांनी केले. उत्सवात दरवर्षी विविध संकल्पना राबविण्याची परंपरा या क्लबने जोपासली. भागातील फक्त महिलांच्या सहभागातून व पुढाकारातून एक आदर्शवादी उत्सव कसा साजरा होवू शकते हे क्लबने दाखवून दिले.

कार्यकर्त्यांच्या कल्पकतेने कमी खर्चात टाकाऊ वस्तूपासून देखावा सादर करण्याची किमीयाही क्लबने अनेकदा दाखवून दिली. मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचाच वापर केला जातो. क्लबने २००१ मध्ये शिरोली जकात नाका परिसरात ‘बाल आनंद वर्ग’ सुरू करून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. बचतीच्या सवयीसाठी ‘मंगलमूर्ती सहकारी भिशी’ सुरू केली. नागरिकांसाठी वृत्तपत्राचे वाचनालय चालवले जाते.

उत्सवामध्ये स्थानिक कलाकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धेबरोबर निबंध स्पर्धेचेही आयोजन केले जाते. गणपतीला अभिप्रेत गणेश याग यज्ञ, व्यसनाचा राक्षस, डॉल्बीच्या भितीने मंडपातून पळून गेलेले बप्पा, वसुंधरेची हाक, लग्नातील उधळपट्टीवर प्रकाश टाकणारा ‘चला गणपती बप्पांच्या लग्नाला’, महापुरातील माणसातील देव, हत्तींची व्यथा याबाबत समाजप्रबोधन करणारे क्लबचे देखावे आजही शहरवासीयांच्या स्मरणात राहीले आहेत.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे अध्यक्ष सागर सामानगडकर, उपाध्यक्ष अब्दुल म्हेतर, सचिव अजिंक्य आंबेकर, खजानीस निखिल खोत, सदस्य संदीप पोवार, सचिन साबळे, अभिजित पोवार, विशाल कोळेकर, अमित पोवार, संजय राऊत, विश्वनाथ पोवार (लकडे), सोहम हावळ आदी नव्या पिढी समाजप्रबोधनाच्या कार्यात सहभागी झाली आहे.

"गणेशोत्सव हा लोकोत्सव आहे. म्हणूनच या उत्सवाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचे कार्य प्रिन्स क्लब करत आहे. गणेशोत्सवात जे देखावे सादर केले जातात. त्यातून समाज प्रबोधन तर होतेच पण नवोदीत कलाकारांना व्यासपीठही उपलब्ध होते. प्रिन्स क्लबच्या सर्वच उपक्रमात महिलांह अबालवृद्ध मोठया संख्येने सहभागी होतात."- अशोक पोवार (संयोजक, प्रिन्स क्लब)

loading image
go to top