'त्याला मारला नसता तर त्यानं आम्हाला मारलं असतं'; खुनी हल्ला प्रकरणी सहा जणांना अटक I Kolhapur Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Crime News

ताब्यात घेतलेल्या संशयित हल्लेखोरांनी कबुली दिल्यावर त्यांना रात्री अटक केली. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली.

Kolhapur Crime : 'त्याला मारला नसता तर त्यानं आम्हाला मारलं असतं'; खुनी हल्ला प्रकरणी सहा जणांना अटक

कोल्हापूर : ‘त्याला मारला नसता तर त्याने आम्हाला मारले असते, किती दिवस भीतीच्या सावटाखाली राहायचे, म्हणून मारले,’ अशी कबुली बोंद्रनगर परिसरातील प्रकाश बोडकेवरील हल्लेखोरांनी प्राथमिक माहितीत पोलिसांना दिली.

सहा हल्लेखोरांना काल पोलिसांनी पिरवाडी (ता. करवीर) येथील बिरोबा मंदिर माळावरून अटक केली. करण राजू शेळके (वय १९), केदार भागोजी घुरके (२७), कृष्णात कोंडीबा बोडेकर (२७), राजू सोनबा बोडके (३२), युवराज राजू शेळके (२१) आणि राहुल सर्जेराव हेगडे (२४ सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे जुना राजवाडा पोलिस (Rajwada Police) ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सांगितले.

फिर्यादीनुसार गुन्ह्यामध्ये दहा संशयितांची नावे आहेत. त्यापैकी तीन अज्ञात असून, विकास ऊर्फ चिक्या हा अद्याप बेपत्ता असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, लक्षतीर्थ वसाहत-बोंद्रेनगरातील पूर्ववैमनस्यातून बुधवारी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील एका कार्यालयात भरदुपारी पाठलाग करून प्रकाश बोडकेवर गुंड संतोष बोडके गॅंगमधील संशयितांनी खुनी हल्ला केला.

त्यांना शोधण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांसह इतर पोलिस ठाण्यातील पथकांनी अहोरात्र प्रयत्न केले. अखेर जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने त्यांना पिरवाडीच्या माळावरून काल ताब्यात घेतले. हल्लेखोर गेली तीन दिवस आहे त्या कपड्यांवर दुचाकीवरून फिरत होते. त्यांच्याकडे असलेल्या काही पैशांमध्ये त्यांनी तीन दिवस काढले, मात्र ते सर्व एकत्रित नव्हते.

त्यांच्याकडे मोबाइल हॅण्डसेटसुद्धा नसल्यामुळे एकत्रित भेटण्यासाठीचे निरोपही देता आले नाहीत. काल दुपारी एका हॉटेलमध्ये जमण्याचा त्यांचा बेत होता. यासाठी त्यांनी कळे दरम्यान भेटलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून ही माहिती साथीदारांपर्यंत पोहचवली होती. काल सर्वजण एकत्रित जमण्यापूर्वीच त्यांना त्या परिसरातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी हल्ला का केला, याची विचारणा केली असता त्यांनी आम्ही त्यांच्या भीतीच्या छायेत होतो. त्यांनी आम्हाला सोडणार नाही, अशी धमकीही दिली होती. त्यामुळे आम्हाला लक्षतीर्थ वसाहत येथे थांबणेही शक्य नव्हते. गेली काही महिने आम्ही खूपच दडपणाखाली होतो. त्यामुळेच सर्वांनी मिळून त्यालाही आपली भीती दाखवायचीच, या हेतूनेच हल्ला केला. त्याला संपविण्याचा आमचा कोणाताही हेतू नव्हता, अशी त्यांनी कबुली दिल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी सांगितले.

ते आम्हाला सोडणार नव्हते...

‘त्यांनी’ आम्हाला दम दिला होता. आम्ही सर्वजण लक्षतीर्थ येथे दिवसा एकत्रित थांबत नव्हतो. आम्हाला ते सोडणार नव्हते. त्यामुळे आम्ही भीतीच्या छायेत होतो. त्यामुळेच हल्ला केल्याची माहिती संशयित आरोपींनी दिल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी दिली.

सर्वजण रेकॉर्डवरील...

ताब्यात घेतलेल्या संशयित हल्लेखोरांनी कबुली दिल्यावर त्यांना रात्री अटक केली. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असून, ते सर्वजण रेकॉर्डवरील असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. दुचाकी कोणाच्या, त्या कोठून आणल्या, खुनी हल्ल्याचा प्लॅन कोठे केला? यासह सविस्तर माहिती पोलिस कोठडीदरम्यान घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.