रत्नागिरी : १४ गावे होणार पाणीदार

चौदा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणी योजना तयार करण्यात आली आहे.
१४ गावे होणार पाणीदार
१४ गावे होणार पाणीदार sakal

राजापूर: तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथील धरणावरून परिसरातील चौदा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणी योजना तयार करण्यात आली आहे. आमदार डॉ. राजन साळवी यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नातून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी या निधीला मंजुरी दिली असून या योजनेमुळे पांगरे बुद्रुक धरणातील पाणीसाठ्याच्या साहाय्याने त्या परिसरातील चौदा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथे धरणाची उभारणी करण्यात आली असून, धरणाचे बांधकाम पूर्ण होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. मात्र, त्या पाणीसाठ्यावर अद्याप कोणतीही नळपाणी योजना राबवण्यात आली नाही. त्यामुळे या पाणीसाठ्याचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या कामांसाठी उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्याचा परिसरातील चौदा गावांना पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने जलजीवन मिशन योजनेंतर्गंत नळपाणी योजनेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याची निधीअभावी अंमलबजावणी रखडलेली होती. त्यासाठी हा निधी मिळावा, म्हणून आमदार साळवी यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला होता.

आमदार साळवींचा पाठपुरावा

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, या अधिवशनादरम्यान आमदार साळवी यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री पाटील यांची भेट घेऊन नळपाणी योजनेसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी तत्काळ २४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती आमदार साळवी यांनी दिली. या निधीच्या माध्यमातून पांगरे धरणावर नळपाणी योजना राबवण्यात येणार असून, त्याद्वारे त्या चौदा गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

राजापूर पांगरे बुद्रुक धरणामध्ये झालेला पाणीसाठा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com