
Kolhapur: मुश्रीफांविरुद्ध खोटी फिर्यादप्रकरणी १६ जणांवर गुन्हा; आक्रमक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे पोलिस ठाण्यासमोरील आंदोलन सहा तासांनी मागे
मुरगूड - सभासदांची कोणतीही संमती न घेता आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी पोलिसांनी आज विवेक विनायक कुलकर्णीसह १६ जणांवर मुरगूड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबतची फिर्याद संजय चितारी यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करणाऱ्या भाजपच्या षड्यंत्रात सहभागी झाल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज हजारोंच्या संख्येने निदर्शने करत मुरगूड पोलिसांवर धडक दिली. ठाण्याच्या दारात सहा तासांपेक्षा अधिक काळ ठिय्या आंदोलन केले.
सभासदांच्या संमतीशिवाय कागल येथील विवेक विनायक कुलकर्णी व अन्य १६ जणांनी श्री. मुश्रीफ यांच्याविरोधात घोरपडे कारखान्यात शेअर्स देतो म्हणून ४० हजार शेतकऱ्यांची ४० कोटींची फसवणूक केल्याची खोटी तक्रार दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
मुश्रीफांविरुद्ध खोटी फिर्यादप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कागल येथील कुलकर्णी व अन्य १६ जणांच्या फिर्यादीनंतर कागल तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक बनले होते. त्यांनी काल सायंकाळपासून पोलिस ठाण्यामध्ये तळ ठोकला होता.
ही तक्रार खोटी असून कोणत्या कागदपत्रांआधारे गुन्हा दाखल केला; तक्रार दाखल करणाऱ्या त्या १६ जणांची नावे द्या, त्यांनी कोणती कागदपत्रे पुरवली त्याची माहिती द्या, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.
त्याला पोलिस अधिकाऱ्यांनी बेदखल केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी मध्यरात्री एकपर्यंत मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांवर सरकारी यंत्रणेचा दबाव असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
पोलिसांनी संबंधित १६ जणांवर बदनामीचा गुन्हा दाखल केल्यानंतर मध्यरात्री दीड वाजता कार्यकर्ते घरी परतले.
दरम्यान, आज सकाळी नऊपासून मुरगूड पोलिस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी संबंधितांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत येथून हालणार नाही,
अशी भूमिका घेतली. रणरणत्या उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. भाजप सरकार, किरीट सोम्मया व समरजितसिंह घाटगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती.
मुरगूड पोलिस कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोपही कार्यकर्ते करत होते. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात होता. कागल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुरगूडमध्ये दाखल झाले. पोलिसांनी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली.
कार्यकर्त्यांनी पोलिसांना आमदार मुश्रीफ यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा; अन्यथा ज्या पद्धतीने तातडीने लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला, त्या पद्धतीनेच ज्यांनी खोटी फिर्याद दाखल केली आहे, त्यांच्यावरही शेकडो सभासद,
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची आम्ही लेखी तक्रार देत आहोत. ती दाखल करुन घ्यावी, अशी मागणी केली. चौकशी करुन गुन्हा दाखल करु, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली; मग लोकप्रतिनिधींवर चौकशी न करता कसा तत्काळ गुन्हा दाखल केला; तुमच्यावर कोणाचा दबाव आहे, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी केली.
कार्यकर्त्यांनी ठाण्याबाहेर येवून ठाण मांडले. यावेळी भय्या माने, प्रवीणसिंह पाटील, अंबरिश घाटगे, डी. डी. चौगुले, सतीश पाटील, विकास पाटील, मनोज फराकटे, प्रवीण भोसले आदींनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.
दरम्यान माजी आमदार संजय घाटगे, शशिकांत खोत, ॲड. सुधीर सावर्डेकर, देवानंद पाटील, राजू आमते, नामदेव भांदिगरे उपस्थित होते.
कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे आणि जागा सोडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी वारंवार संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. अखेर सायंकाळी चारला ''त्या'' १६ जणांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तेंव्हाच ठिय्या आंदोलन मागे घेतले.
हे खपवून घेणार नाही..
आमदार मुश्रीफ यांनी सर्वांना सोबत घेवून जाण्याची भूमिका घेतल्याने तालुक्यातील राजकीय संघर्ष थंडावलाय. तो ठिणगी टाकून पेटवण्याचे काम समरजित घाटगे व भाजप करत आहेत, असा आरोप प्रवीणसिंह पाटील यांनी केला.
आंदोलनस्थळी गावागावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, कारखान्याचे सभासद, शेतकरी दाखल.
भाजप सरकार हाय हाय; हुकूमशाही, ईडी सरकारचा धिक्कार असो, समरजित घाटगेंचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी
आंदोलन समारोपप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ यांचे दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांचे आभार मानत मार्गदर्शन
रणरणत्या उन्हात उपस्थितांसह पोलिसांना वडापाव, पाण्याच्या बाटल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
खोट्या गुन्ह्यांनी माझी विश्वासार्हता संपणार नाही. समरजित घाटगे यांनी केलेली विधाने दिशाभूल करणारी व लोकांच्या मनात गैरसमज पसरवणारी आहेत. मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात मला अडकवून टाकण्याच्या इराद्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट होतो.
- हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे नेते