
जपानमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
इचलकरंजी : संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशात आणि जगभरातील विविध देशात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. जपानमधील भारतीय दूतावास आणि भारत कल्चरल सोसायटी, जपान या संस्थेने संयुक्तपणे टोकियोमध्ये प्रथमच शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. भारतीय दूतावासाच्या विवेकानंद कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला आणि मुलांसह भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.
अनार्घ्या, सना आणि तेजस्विनी यांच्या भारतनाट्य नृत्य प्रकारातून सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाल्यावर 'छत्रपती शिवाजी महाराजांचे भारताच्या जडणघडण मध्ये योगदान' या विषयावर दूतावासाच्या उपप्रमुख मयांक जोशी यांनी भाषण दिले तर 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून मिळणारे मॅनेजमेंट धडे' या विषयावर विकास रंजन यांनी व्याख्यान दिले.
या समारंभामध्ये हर्षल खोले यांनी कवी भूषण यांच्या कवितांचे वाचन, टोकियो लेझीम पथकाने लेझीम नृत्य, गायक दिनेश वडथु यांनी राष्ट्रवीरांवर आधारित तेलगू गाणे, राजेश आवाके यांनी पोवाडा आणि लहान मुलांनी `जय भवानी जय शिवाजी` या गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा नेवे यांनी केले. संजीव मनचंदा यांनी आभार प्रदर्शन केले.
Web Title: Shiv Rajyabhishek Din Being Celebrated In Japan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..