esakal | वीकेंडच्या लॉकडाउननंतर  खरेदीसाठी झुंबड.. 

बोलून बातमी शोधा

Shopping rush after weekend lockdown.

चार दिवसांच्या बंद-सुरू खेळानंतर आणि वीकेंडच्या कडक लॉकडाउननंतर आज व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निर्णयानुसार आज सकाळी शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यानंतर पोलिसांनी, महापालिका प्रशासनाने ती बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज पुन्हा एकदा शहरात व्यापार सुरू-बंद अशी स्थिती राहिली.

वीकेंडच्या लॉकडाउननंतर  खरेदीसाठी झुंबड.. 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : चार दिवसांच्या बंद-सुरू खेळानंतर आणि वीकेंडच्या कडक लॉकडाउननंतर आज व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निर्णयानुसार आज सकाळी शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यानंतर पोलिसांनी, महापालिका प्रशासनाने ती बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज पुन्हा एकदा शहरात व्यापार सुरू-बंद अशी स्थिती राहिली. दुपारीनंतर व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आदेश धुडकावून दुकाने सुरू केली. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी फूल बाजार, भाजी मंडई येथे नागरिकांनी गर्दी केली. येथे कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते. 
आज सकाळपासून बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत झाले, पण पोलिस प्रशासनाने दुकाने सक्तीने बंद केल्याने दुपारपर्यंत शहराच्या काही भागात संभ्रम होता. महाद्वार रोड, ताराबाई रोड, शिवाजी रोड, चप्पललाईन परिसरातील दुकाने बंद राहिली. 
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पोलिसांना त्यांचे काम करू द्या, जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून दुपारपर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. त्यानंतर चेंबरचे शिष्टमंडळ कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे गेले. त्यानंतर पुन्हा ठराविक भागातील दुकाने सुरू होती. पोलिस रस्त्यावर विनाकारण थांबू नका, असे आवाहन करत होते मात्र सक्तीने बंदची कारवाई झाली नाही. 

पोलिसांकडून बंदचे आवाहन 
सकाळी सातला संचारबंदी संपल्यानंतर दुकाने सुरू झाली. मंगळवार (ता. 13) गुढी पाडवा असल्याने फूल बाजारातही खरेदीसाठी गर्दी झाली. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, सुभाष रोड, बिंदू चौक, भाऊसिंगजी रोड, माळकर तिकटी येथील व्यवहार पूर्ववत झाले. सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. कारवाईच्या भीतीपोटी महाद्वार रोड, ताराबाई रोड, छत्रपती शिवाजी चौक परिसरातील दुकाने बंद झाली. 

ट्रॅफिक जाम 
वीकेंड लॉकडाउनमध्ये किराणा माल तसेच अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद केली. व्यापारी तसेच दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आता सणाच्या तोंडावर पुन्हा बंद करण्याचे आवाहन केले जात असेल तर व्यवसाय करायचा कधी? असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला. दुपारनंतर आज शहरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाली. शहरात वाहतूक कोंडी होईपर्यंत ग्राहक, वाहनधारक रस्त्यावर आले होते. 

गुढीपाडवा आणि खरेदीला गर्दी 
गुढीपाडवा असल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी आज गर्दी केली होती. मेसकाठी, साखरेची माळ व इतर साहित्य खरेदीसाठी ग्राहक रस्त्यावर होते. व्यापाऱ्यांनाही हीच गर्दी कॅश करण्यासाठी त्यांनी दंडात्मक कारवाई, आणि गुन्ह्याती भीती न बाळगता दुकाने सुरू ठेवली. आज दिवसभरात सकाळचे काही तास वगळता दुकाने सुरूच राहिली.