Kolhapur : दर्शन रांगेचा व्यापाराला बसणार फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur ambabai temple

Kolhapur : दर्शन रांगेचा व्यापाराला बसणार फटका

कोल्हापूर : कोरोनाने गेली दोन वर्षे साऱ्यांनाच फटका बसला. दहीहंडी, गणेशोत्सव निर्बंधमुक्त केले असताना नवरात्रोत्सवात अंबाबाई दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी छत्रपती शिवाजी चौकापासून मुख्य दर्शन रांगेची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील इतर रस्त्यांवरील सराफ, रेडिमेड कपडे, चप्पल, गृहोपयोगी साहित्य, भांडी यांसह विविध किरकोळ व्यापाराला मोठा फटका बसण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. या विरोधात व्यापारी एकत्र आले असून, हा वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.

नवरात्र उत्सवात नेहमी कोट्यवधीची उलाढाल होते. गेल्यावर्षी निर्बंध असल्याने केवळ दहा टक्के व्यवसाय झाला. व्यापाऱ्यांनी परिस्थिती समजावून घेतली. यंदा इतर उत्सव निर्बंधमुक्त होत असल्याने व्यापाऱ्यांनी जास्तीतजास्त व्यवसाय करण्याच्या हेतूने माल भरण्यास सुरुवात केली आहे. येथून व्यापाराला चालना मिळाली तर जिल्ह्यातील व्यापारही धावण्यास मदत होणार आहे. सोमवारी नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. त्यासाठी काही निर्णय घेतले जात आहेत.

मुख्य रांग छत्रपती शिवाजी चौकातून सुरू केल्यास तिथून भाविक थेट मंदिरात जातील, आजूबाजूच्या परिसरात फिरण्यास वाव मिळणार नाही. परिणामी, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, गुजरी गल्ली, जोतिबा रोड, भेंडे गल्ली, नवीन बाबूजमाल रोड, राजोपाध्ये बोळ, ताराबाई रोड या परिसरातील व्यापारावर परिणाम होणार असल्याची भावना व्यापारी व्यक्त करत आहेत. पूर्वीप्रमाणेच भवानी मंडप परिसरातूनच रांग सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी महाद्वार व्यापारी असोसिएशन, कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशनने बॅरिकेडस् न लावता रस्ते खुले ठेवावेत या मागणीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांना आज दिले. उद्या उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही ते भेटणार आहेत.

फटका कोणाला?

भेंडे गल्लीतील सराफांची होलसेल दुकाने

गुजरी, कासार गल्ली, जोतिबा रोड, न्यू गुजरी सराफ, भांडी दुकाने

जोतिबा रोड, ताराबाई रोड, महाद्वार रोडवरील कापड, रेडिमेड गारमेंट, किरकोळ विक्रेते

चप्पल लाईनमधील दुकाने

या मार्गावरील भाविकांचे काय?

नवरात्रोत्सवात शिवाजी स्टेडियम येथील पार्किंगमध्ये वाहने लावून मिरजकर तिकटीमार्गे मंडपात भाविक येतात. जर शिवाजी चौकातून मुख्य दर्शन रांग सुरू केली तर त्यांना मिरजकर तिकटी वा बिंदू चौकातून शिवाजी चौकापर्यंत जावे लागल्यास त्यांची पायपीट वाढेल.

कोरोनाआधी ज्या पद्धतीने रांग होती, तशीच व्यवस्था आता असेल. छत्रपती शिवाजी चौकातून मॅट अंथरले जाणार आहे, मंडप मारला तरी तिथून रांग होणार नाही. गर्दी वाढेल, त्यावेळी निर्णय घेतला जाईल. वाहतूक सुरू ठेवण्यास अडचण नाही.

- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

छत्रपती शिवाजी चौकातून रांग करून या परिसरातील व्यापार उठवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यावर येणाऱ्या रस्त्यांना बॅरिकेडस् लावू नयेत, वाहतुकीसाठी खुले ठेवावेत ही मागणी आहे. भवानी मंडपातूनच रांग सुरू करावी.

- किरण नकाते, अध्यक्ष, महाद्वार व्यापारी असोसिएशन

Web Title: Tempal Darshan Trade Loss Navratriotsav Ambabai Darshana Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..