Kolhapur : झटका ‘छटाक’चा, फटका आयुष्यभराचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा

झटका ‘छटाक’चा, फटका आयुष्यभराचा

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पन्नास, शंभर रुपयांच्या पॉकीट मनीमधून पन्नास-शंभर ग्रॅमची ‘छटाक’ची पुडी आयुष्य उद्‍ध्वस्त करणारी आहे. त्याची कधी चटक लागली हे त्याचे आयुष्य बिघडण्यास सुरूवात झाल्यावरच कळते. पुढे यातून परत फिरण्याचे मार्ग बंद होत जातात तेव्हा पालकांची झोप उडते. वेळीच समुपदेशन झाले तर यातून बाहेर पडता येते; पण अमली पदार्थ, गांजाच्या धुराचा एक झुरका आयुष्यासोबत कुटुंब केव्हा उद्‍ध्वस्त करतो हेच कळत नाही. म्हणून शहरासह जिल्ह्यात ‘छटाक’ आपल्या घरापर्यंत पोचणार नाही याची खबरदारी घेण्याची आज वेळ आली आहे.

‘छटाक’ हा एक गांजाचा प्रकार म्हणून विकला जातो. खुलेपणाने गांजा विक्री होणे काही प्रमाणात अशक्य असते. त्यामुळे कोडवर्ड म्हणून ‘छटाक’ म्हटले जाते. आजपर्यंत काही वेळा पोलिसांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. मुडशिंगी, जयसिंगपूरसह कोल्हापुरातील शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली आहे; मात्र आज अशी विक्रीच होत नाही म्हणणे थोडे धाडसाचे होईल. ड्रग्ज (अमली पदार्थ) या एका मुद्यावर राज्य आणि देश पातळीवरील राजकारणाबरोबरच बॉलिवूडही ढवळले गेले आहे. बडी आसामी असलेले ताकदीने या प्रसंगाला सामोरे गेले; मात्र हीच स्थिती सर्वसामान्यांवर आली तर त्यांचे कुटुंब कधी रसातळाला जाईल हे समजणार नाही. नशेची एक झिंग काहीसा अघोरी आनंद देऊन जाते; मात्र क्षणभंगूर असलेल्या एका झुरक्यात जीवनाची राख होऊ शकते, हे मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच दिसून येते.

हेही वाचा: सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या परीक्षा ऑफलाईनच

पालक कॉलेजकुमार म्हणून देत असलेल्या पॉकीट मनीमधूनही छटाकची चटक लागू शकते. जे कॉलेज कुमार नाहीत मात्र हातात पैसे खेळणारा छोटा व्यावसायिक आहे, तोही या छटाकच्या आहारी गेल्याचे सांगण्यात येते. काही मित्रांच्या नादानेच छटाकच्या आहारी गेल्याची माहिती यापूर्वी झालेल्या कारवाईतून पुढे आली आहे. कधी आनंदात, तर कधी दुःखाच्या प्रसंगात छटाकचा झुरका घेतला जातो आणि पुढे तो कधी दैनंदिनी बनतो हेच कळत नाही. त्यातून तो पुढे मिळविण्यासाठी होणारी धडपड नक्कीच कुटुंब उद्‍ध्वस्त करण्याकडे जाते. यावेळी पालकही हतबल होतात.

जिल्ह्यात चंदगड तालुक्यात ड्रग्जचा कारखाना उद्‍ध्वस्त करून सव्वादोन कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पोलिसांनी ही कारवाई करून मुंबईतून ड्रग्जचे लोण आता गाव पातळीवर पोचल्याचे दाखवून दिले. आता हीच स्थिती कधी आपल्या उंबरठ्यापर्यंत येईल हे कळणार नाही. त्यामुळे वेळीच तरुणाईंसोबत त्यांच्या पालकांनी जागृत राहण्याची गरज अधोरेखित होत आहे. कशा प्रकारे तरुणाई नशेत गुरफटत आहे, दम मारो दमचा एक एक घोट मागील दरवाजातून कसा आपल्या घरात घुसत आहे, याला कसे रोखता येईल, पालकांनी, तरुणांनी काय खबरदारी घ्यावी, यावर आधारित मालिका आजपासून...

स्कोअर, ग्रास अन् स्क्वीडही...

स्कोअर, ग्रास, स्क्वीड अशा नावांनीही ‘छटाक’ची मागणी होते. विशेष करून उच्चशिक्षित तरूण, तरूणींकडून या इंग्रजी नावांचा वापर गांजा मागण्यासाठी होतो. कॉलेज परिसर आणि खासगी क्लास यासह काही ठराविक ठिकाणीच नेहमीच्या ग्राहकांना ही नावे माहिती आहेत. त्यामुळे इंग्रजी नावातून मागणी केल्यास हा नेहमीचा ग्राहक असल्याचे संबंधितांकडून ओळखले जाते. तसेच ‘छटाक'' हे नाव स्थानिकांकडून उच्चारले जाते तर बाहेरून कोल्हापुरात शिकण्यासाठी आलेल्या, उच्चशिक्षित तरूणाईकडूनच इंग्रजी नावांचा वापर होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top