टुडे १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १
टुडे १

टुडे १

sakal_logo
By

तुडुंब नदी नि तहानलेले डोळे..
-----------------
नदी तिरांवर ग्रामस्थांतर्फे जलदिंडीचे जल्लोषी स्वागत

राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. २१ : आज भोगावती नदी नेहमीप्रमाणे तुडुंब आणि संथ होती, नितळ निळेशार पाणी, दुतर्फा हिरवीगार झाडी, आल्हाददायक गारवा, अशा प्रसन्न वातावरणात कोल्हापूरच्या ओढीने शुद्ध पाण्याचा जलकुंभ घेऊन चाललेली जलदिंडी. भुकेला क्षणभर थोपवून दिंडीच्या आतुरतेने नदीच्या घाटाघाटांवर ग्रामस्थांचे तहानलेले डोळे, असे चित्र भोगावती तिराने आज पाहिले.
‘सकाळ’ने कोणताही उपक्रम घ्यावा आणि भोगावती काठावरील लोकांनी त्याला भरभरून साथ द्यावी, हेच प्रेमाचे नाते आजही जलदिंडीच्या माध्यमातून दिसून आले. सकाळी आठ वाजता जलदिंडीचा मार्ग आणि स्वागताच्या ठिकाणच्या वेळा ग्रामस्थांनी पाळल्या होत्या. जलमार्गातील अडथळे पार करत बंधाऱ्यावरून बोट उचलून नेऊन नदीपात्रात सोडणे हे दिव्य व्हाईट आर्मी आणि स्थानिकांनी पेलले. कोवळ्या उन्हापासून सुरू झालेली ही दिंडी वाढत्या उन्हाला अंगावर घेत दुथडी नदीतून मार्गक्रमण करीत होती. कुठे खडकावरून आदळणाऱ्या पाण्यात हेलकावे तर कुठे पात्रातील पान गवतात फसणे. पात्रात मधोमध आलेल्या बांबूसह झाडांच्या फांद्या चुकवत जाताना डोक्यांना बसणारा मार, अंगावर ओरखडे, मधेच नदीतील जलचरांची विविधता आणि पक्षांचे किलबील हा सारा सृष्टीचा पसारा साथ करत जलदिंडी प्रवास सुरू होता. प्रत्येक नदी घाटांवर ग्रामस्थ उन्हाची आणि भुकेची पर्वा न करता थांबले होते.
नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘सकाळ’च्‍या मोहिमेला साथ देत लोक घाटाघाटावर भरलेल्या नदीपात्राकडे तहानलेल्या डोळ्याने पाहात होते. नजरेच्या टप्प्यात जलदिंडी येताच त्यांचा चेहरा उजळ होता आणि उत्साहाने जलकुंभाचे पूजन होत होते. हे चित्र गावागावांत होते. वेगळी अनुभूती आणि देखणे चैतन्य भोगावतीतीराने अनुभवले.
----------------
राजर्षी शाहूंचा जयघोष
शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी स्वधन ओतून धरणाचा पाया रचला आणि तेव्हापासून भोगावती माई अविरत वाहत आहे. याच राजाच्या नावाने आजची कृतज्ञता दिंडी लोकांना प्रोत्साहित करीत होती. प्रत्येक घाटावर राजर्षी शाहू महाराजांचा जयघोष होत होता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top