रत्नागिरी-हापूस मिळणार अ‍ॅमेझॉनवरही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-हापूस मिळणार अ‍ॅमेझॉनवरही
रत्नागिरी-हापूस मिळणार अ‍ॅमेझॉनवरही

रत्नागिरी-हापूस मिळणार अ‍ॅमेझॉनवरही

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat7p18.jpg-
१३१९४
रत्नागिरी ः अ‍ॅमेझॉनच्या आंबा संकलन केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना पणनचे मिलिंद जोशी. सोबत समीर दामले, राजेश प्रसाद आदी.
(राजेश कळंबटे ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------------
रत्नागिरी हापूस आता अ‍ॅमेझॉनवरही

एमआयडीसीत संकलन; थेट बागायतदारांकडून खरेदी

राजेश कळंबटे ःसकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः ऑनलाईन विक्री करणाऱ्या‍ कंपन्यांकडून विविध वस्तूंबरोबरच रत्नागिरी हापूसही विकला जात आहे. काही आंबा ऊत्पादकही ऑनलाईन विक्री करतात. यामध्ये आता अ‍ॅमेझॉन कंपनीही उतरली आहे. थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरुवात केली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र चालू केले असून, आरंभीलाच १२ शेतकऱ्‍यांकडून ६०० डझन आंब्याची खरेदी केली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात आले.
रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्‌घाटनप्रसंगी पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद, विवेक धवन, सुजय हेगडे, नरेंद्र जवळे, श्री. कल्पेश यांच्यासह बागायतदार उपस्थित होते. हे अ‍ॅमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. येथे आंबा बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुणे येथील ॲमेझॉनच्या ग्राहकांना पोहोचवला जाणार आहे. भविष्यात देशाच्या कानाकोपऱ्या‍त पोहोचवून निर्यातही केला जाणार आहे. आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरित पैसे दिले जाणार आहेत. तसेच आंबा बागायतदार राजेश पालेकर यांच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यापासून बिटकी आंबाही खरेदी केला जाईल, असे प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
उद्‌घाटनप्रसंगी जोशी म्हणाले, ‘कोरोना ही बागायतदारांसाठी इष्टापत्ती ठरली आहे. अनेकांनी दलालावर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. अ‍ॅमेझॉनच्या रूपाने बागायतदारांना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्याचा उपयोग करून दर्जेदार आंबा कंपनीला दिला तर बागायतदाराला चांगला दरही मिळेल. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या थेट विक्रीसाठी येऊ लागल्यामुळे शेतकऱ्या‍‍ला दर ठरवता येणार आहे. ही भविष्याची नांदी ठरणार आहे, तर बागायतदार समीर दामले म्हणाले, ‘बागायतदार पूर्वी दलालावर अवलंबून राहत होता. तो सांगेल तोच दर ठरवला जाई. आता कंपनी थेट खरेदी करत असल्याने दर चांगला मिळेल. जीएसआयमुळे (भौगोलिक मानांकन) गुणवत्तेला प्राधान्य मिळणार आहे.

कोट
हापूसला चांगला दर मिळवून देत असतानाच बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी आवश्यक खते, औषधे, साहित्य अ‍ॅमेझॉनकडून उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. पुढील वर्षी वेगळ्या पद्धतीने यावर काम करू. फक्त हापूसची खरेदी हे लक्ष ठेवता वेगळ्या पद्धतीने विचार करत आहोत.
- राजेश प्रसाद, प्रमुख व्यवस्थापक, अ‍ॅमेझॉन

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..