
चंद्रकांत पाटील प्रेस बातमी
पालकमंत्र्यांच्या स्वभावामुळे आमचा विजय
चंद्रकांत पाटील यांना विश्वास; पालकमंत्र्यांनी आता खुन्नस कमी करावी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे शुभेच्छा दिल्या. त्यांना उदंड आयुष्य मिळो. त्यांनी लोकांवर प्रेम करावे. खुन्नस धरू नये. आमच्या विजयात सतेज पाटील यांच्या स्वभावाचे मोठे योगदान आहे, अशी कोपरखळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘६० टक्क्यांच्या खाली मतदान होणार नाही. मतदानाचा टक्का वाढला की भाजपचा विजय निश्चित होतो. ज्यांचे पहिलेच मतदान होते असे १६ हजार मतदार होते. त्यांचे ८० ते ८५ टक्के मतदान झाले आहे. भाजपचा विजय मोठ्या फरकाने होईल. प्रचंड दबाव असूनही प्रशासनाने चांगले काम केले. त्यांना नियमांच्या अनेक चौकटी दबाव टाकून मोडायला लावल्या. आमच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले; पण त्याच्याकडे काही सापडले नाही. सचिन तोडकर याच्या घराची तपासणी केली. पोलिसांकडे कोणतेही वॉरंट नव्हते. कोणत्याही स्थितीत २० ते २५ कार्यकर्त्यांना अडकवायचे असा त्यांचा डाव होता; पण कोणत्याही केसमध्ये काहीही सापडले नाही. पोलिसांनीही चांगले काम केले.’’
पालकमंत्री सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या का यावर पाटील म्हणाले, ‘‘दिवसभर त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट झाली नाही. त्यामुळे आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे शुभेच्छा दिल्या. खूप मोठे आयुष्य मिळावे. त्यांनी लोकांवर प्रेम करावे. लोकांना त्रास देऊ नये. खुन्नसने वागू नये. आमच्या विजयात त्यांच्या स्वभावाचे खूप मोठे योगदान आहे.’’
त्याबद्दल कटुता नाही
चंद्रकांत पाटील यांना मंगळवार पेठेत विरोध करून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. याबद्दल ते म्हणाले, ‘‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणे मांडण्याचा अधिकार. तरीही विरोध केला गेला. आज तुम्ही जोरात होतात. माझ्या विरोधात घोषणा दिल्या. काही प्रघात असतात. ते पाळणे चांगले. अशातून ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो.’ या प्रसंगाबद्दल किंवा कोणाहीबद्दल माझ्या मनामध्ये कटुता नाही.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..