
टोपे बातमी
१७०८७
आरोग्य मंत्र्यांकडून सेवा रुग्णालयाचे कौतुक
सदिच्छा भेट; राज्यातील इतर रुग्णालयांनी आदर्श घेण्याचे केले आवाहन
कोल्हापूर, ता. २३ ः सेवा रुग्णालयातील स्वच्छता, टापटिपपणा वाखाणण्यासारखा असून राज्यातील इतर रूग्णालयांनी याचा आदर्श घ्यावा, अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयाच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या समारोपासाठी टोपे आज कोल्हापुरात होते. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयाला भेट दिली. सुमारे अर्ध्या तासाच्या या भेटीत या रूग्णालयाच्या अडचणीही त्यांनी समजून घेतल्या.
रुग्णालयात येताच श्री. टोपे यांनी या रुग्णालयाबाबत बरेच ऐकून होतो, वृत्तपत्रातील बातम्यांतून रुग्णालयाचे कामकाज समजत होते, आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला ही आनंदाची बाब असे सांगितले. या रुग्णालयासाठी आग प्रतिबंधक यंत्रणा मंजूर असून त्याचा पाठपुरावा करा, असेही टोपे यांनी सांगितले. रूग्णालयाचा अतिरिक्त शंभर खाटांचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठवला आहे, त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
सुरूवातीला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी यांनी रूग्णालयाची माहिती संगणकावर दिली. स्वच्छता, परिसरातील प्रसन्न वातावरण आणि खासगी रुग्णालयाला लाजवेल अशी व्यवस्था पाहून श्री. टोपे भारावून गेले.
यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी, डॉ. सी. एल. कदम, डॉ. एल. एस. पाटील आदि उपस्थित होते. रुग्णालयातून बाहेर पडताना मंत्री टोपे यांनी नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून त्यांच्यासोबत फोटो काढला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..