
नूलच्या बलभीम देवाची यात्रा उत्साहात
नूलच्या बलभीम देवाची यात्रा उत्साहात
नूल, ता. २४ : येथील ग्रामदैवत श्री बलभीम देवाची वार्षिक यात्रा उत्साहात झाली. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा यात्रेचे आयोजन केले होते. यानिमित्ताने दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले केले होते. विशेषत: दर्शनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी (ता.२०) गंगापूजन (पाणी भरणे) व शिव भजन कार्यक्रम झाला. गुरुवारी (ता. २१) आंबील गाडीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. हनुमान व्यायाम मंडळातर्फे मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळी पूजा-अर्चा, अभिषेक, नैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर पालखी मिरवणुक निघाली. हौशी बैलजोडी संघटनेतर्फे सदृढ बैल जोडी स्पर्धा झाल्या. बैलजोडी गट, दाती आणि बिनदाती अशा तीन गटातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी बैलगाडी, घोडागाडी शर्यती झाल्या. त्यानंतर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान झाले. विजेत्यांना यात्रा कमिटी वतीने बक्षीस देण्यात आले. रात्री अक्कमहादेवी या कन्नड नाटकाचे सादरीकरण करण्यात आला. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी श्री सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बलभीम यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..