
वन्यजीवांच्या त्रासाने शाहूवाडीतील शेतकऱ्यांत धास्ती
वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांत धास्ती
शाहूवाडी तालुका; बिबट्या, गवे, माकडांसह मोरांचा उपद्रव
सकाळ वृत्तसेवा
आंबा, ता. २७ : बिबट्या, गवे, मगर, माकडे आणि मोर या वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शाहूवाडीतील शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे. शित्तूर वारूण, उखळू, उदगिरी, कोतोली, येळवण जुगाई या जंगलव्याप्त भागात बिबट्याचा कायम वावर आहे. उदगिरी येथील धनगरवाडयावर बिबट्याच्या हल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. या भागात गायी आणि बकऱ्या फस्त करण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाला आहे.
शित्तूर वारूण व उदगिरी भागात गव्याने शेतकऱ्यांवर हल्ला केले आहेत. गव्यांच्या कळपाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आंबा, परळे निनाई, उदगिरी, विशाळगड, येळवण जुगाई, कांडवण या भागात गव्यांचे कळप आहेत. हे कळप ऊस, मका या पिक फस्त करत आहेत. गव्यांच्या कळपांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी डबे व फटाके वाजवणे, जोरजोराने आरोळी देणे, मचाण बांधून रात्री जागून काढणे असे नानाविध प्रकार करत आहे. माकडे मक्याची कोवळी कणसे खात आहेत. नद्यांमध्ये अधुनमधून होणारे मगरीचे दर्शन शेतकऱ्यांना धडकी भरवत आहे.
-------------
कोट
रविवारी रात्री गव्यांच्या कळपाने जवळपास एक एकरमधील मक्याच्या पिकाचे नुकसान केले. पोटच्या पोराप्रमाणे जपणूक केलेली पिके वन्यप्राणी फस्त करत आहेत. पिकाचे नुकसान झालेले पाहून जीव कासावीस होतो. नुकसानीची तुटपुंजी मदत पुरत नाही.
- भरत पाटील, शेतकरी, चांदोली