
वनसंपदा टिकवून ठेवणे गरजेची - अरविंद पाटील
चांदोली प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण
आंबा ः ग्लोबल वॉंर्मिगचा सामना करण्यासाठी वनसंपदा टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे धडे घेतले पाहिजेत, असे मत चांदोली वन्यजीव विभागाचे वनरक्षक अरविंद पाटील यांनी केले. जागतिक वन दिनानिमित्त चांदोली प्राथमिक शाळेत आयोजिलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आकाराम पाटील होते. याप्रसंगी विविध बियांच्या संकलनासह निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते.
स्पर्धांत वैष्णवी पाटील, शंभूराजे सुतार, अनुष्का कुंभार, सागर पाटील, शिवम शेट्ये, विघ्नेश पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख बी. बी. कोंडावळे, पदवीधर शिक्षक महादेव कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप जाधव, रोहिणी फुंदे उपस्थित होते. उमेश नांगरे यांनी आभार मानले.