
पर्यटनाला नवा आयाम देवू ः रामलिंग चव्हाण
पर्यटनाला नवा आयाम देऊ
रामलिंग चव्हाण : शाहूवाडीत पर्यटन विकास समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
आंबा, ता. १८ : तालुका पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून येथील पर्यटनाला नवा आयाम दिला जाईल, असे प्रतिपादन पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी व्यक्त केले.
तालुका पर्यटन विकास समितीची बैठक शाहूवाडी तहसील कार्यालयात झाली. या वेळी ते बोलत होते. निसर्गसमृद्धतेने परिपूर्ण असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळे परिपूर्णतेने विकसित होण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत पर्यटन विकास आराखडा तयार करून रोजगार निर्मिती होणे गरजेचे असल्याची भूमिका पर्यटन विकास समितीच्या बैठकीत मांडण्यात आली.
हिल रायडर्सचे प्रमुख प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘शाश्वत पर्यटनासाठी शाहूवाडीचा ब्रॅंड तयार करण्याची गरज आहे.’’ सुखदेव गिरी म्हणाले, ‘‘स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण द्यायला हवे.’’ विनोद कांबोज म्हणाले, ‘‘सुटीतील पर्यटनाखेरीज अन्य हंगामात पर्यटकांना सहल पॅकेज ही संकल्पना राबविण्यात यावी.’’ निसर्ग अभ्यासक राजेंद्र लाड, डॉ. झुंजार माने, प्रमोद माळी यांनी वर्षा व अन्य ऋतू पर्यटन, आडवाटेवरच्या निसर्गरम्य ठिकाणी ट्रेकिंग मार्ग, पर्यटन महोत्सव, घाटमाथ्यावरील समृद्ध सडे, जंगल सफारी यांचे मार्केटिंग आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी, मुख्याधिकारी विद्या कदम, आनंदा सुतार यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी आभार मानले.
----------------
चौकट
रोजगार निर्मितीला चालना द्या
निसर्गरम्य आंबा, मानोली, केर्ले, कडवी धरण, उदगिरी, पावनखिंड, पांढरे पाणी, येळवण जुगाई, बर्की, अनुस्करा घाट, कांडवण, धोपेश्वर, गेळवडे जलाशय या रमणीय ठिकाणी पर्यटनविषयक विकास आराखड्यातून रोजगार निर्मितीला चालना देण्याची भूमिका या वेळी उपस्थितांनी मांडली.