पर्यटकांमुळे गगनबावडा हाऊसफुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांमुळे गगनबावडा हाऊसफुल्ल
पर्यटकांमुळे गगनबावडा हाऊसफुल्ल

पर्यटकांमुळे गगनबावडा हाऊसफुल्ल

sakal_logo
By

00445
गगनबावडा ः येथील भुईबावडा घाटातील धबधब्याजवळ झालेली पर्यटकांची गर्दी

पर्यटकांनी गगनबावडा बहरला
सुटीमुळे हाऊसफुल्ल गर्दी; झिम्माड पाऊस आणि धुक्याचा आनंद

असळज, ता. १७ : गगनबावडा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे महाबळेश्वर, येथील दाट धुक्यात कोसळणारा झिम्माड पाऊस, करूळ व भुईबावडा घाटातून होणारे वर्षा ऋतूचे विलोभनीय दृश्य सर्वांनाच मोहीत करते. पाऊस घेऊन येणारे ढग अंगावर कसे कोसळतात, याचा वेगळा अनुभव येथे येणाऱ्या पर्यटकांना मिळतो. येथील पाऊस अंगावर झेलत तरुणाई चिंब भिजत आनंद द्विगुणीत करतानाचे चित्र गगनबावड्यात पाहावयास मिळत आहे. या परिसरात रविवारी पावसाळी पर्यटन खऱ्या अर्थाने फुलले. सुटीमुळे पर्यटकांनी गगनबावडा बहरला आहे.
शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी असला तरी कोकण घाटमाथ्यावरचा करूळ व भुईबावडा घाट, गगनबावडा परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. एरवी मुसळधार पावसात त्याचा आनंद घेण्यासाठी गाडीतून खाली उतरणे अशक्य होते. आज पावसाचा जोर थोडा कमी असल्याने पर्यटकांना पावसाचा मनसोक्त आनंद घेता आला. कोकणातील दऱ्यातून वाऱ्याने वर येणारे ढग पावसाची वेगळीच अनुभूती देत असतात.
गगनगड, करूळ, भुईबावडा घाटातून वाहणारे झुळझुळ झरे व कड्यावरून स्वच्छंदपणे कोसळणारे पांढरे शुभ्र लहान-मोठे धबधबे पर्यटकांचे मन मोहून टाकत आहेत. हिरवागार शालू परिधान केल्याचा भास निर्माण करणाऱ्या घाटातील टेकड्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

--
रानभाज्‍यांना बहर
कोणत्‍याही रासायनिक खताशिवाय नैसर्गिकपणे डोंगरावर, शेती बांधावर, पडिक जमिनीवर उगवणाऱ्या रानभाज्‍यांना ग्रामीण भागात मोठी मागणी असते. पावसामुळे औषधी गुणधर्म असणाऱ्या विविध प्रकारच्‍या रानभाज्‍यांची उगवण गगनबावडा तालुक्‍यात झाली असून, चविष्‍ट व रूचकर अशा रानभाज्‍यांची मेजवानी प्रत्‍येक घराघरांत होत आहे. मोर शेंडवल, पात्री, पुडशी, गोमाटी, कुर्डू, भारंगी, भोपळी, नाल, आळंबी अशा अनेक जातींच्‍या रानभाज्‍यांचा यात समावेश होतो. डोंगर, रानावनात व शेती बांधावर सहजपणे या भाज्‍या उपलब्‍ध होत असल्‍याने ग्रामीण भागात या आवडीने चाखल्‍या जात आहेत. रानभाज्‍यांची जंगलातून निवड करताना ती जाणकार मंडळीकडून करून घेणे गरजेचे असते.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00245 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..