
शाळकरी मुलाचा धामणी नदीत बुडून मृत्यू.
01006
...
वेतवडेत शाळकरी मुलाचा
धामणी नदीत बुडून मृत्यू
सुटीसाठी आजोळी गेला असता दुर्दैवी घटना
असळज, ता. २७ : वेतवडे (ता.पन्हाळा) येथील धामणी नदीपात्रात अंघोळीसाठी गेला असता पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. आदित्य शिवाजी पाटील (रा. खेरीवडे, वय १३) असे त्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने खेरीवडे (ता.गगनबावडा) या त्याच्या मुळगावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खेरीवडे (ता.गगनबावडा) येथील शिवाजी भिकू पाटील हे खासगी नोकरीनिमित्त कुटुंबासह पुण्यामध्ये राहतात. मे महिन्यातील सुटीनिमित्त ते गावी आले होते. मोठा मुलगा दहावीत शिकत असल्याने ते काही दिवसांपूर्वी पुण्यास परत गेले होते. पण धाकटा मुलगा आदित्य हा वेतवडे (ता.पन्हाळा) येथे मामाच्या गावी गेला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आदित्य धामणी नदीवर अंघोळीला गेला होता. तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. म्हणून सायंकाळी सातनंतर त्याची शोधाशोध सुरू केली होती. पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. धामणी नदीकाठी त्याची कपडे आढळून आली. त्यामुळे तो पाण्यात बुडाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊन नदीपात्रात शोध मोहीम राबविली. कळे पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह पाण्याबाहेर काढला. कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. खेरीवडे (ता.गगनबावडा) या त्याच्या गावी शनिवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.