
मुलींचा मृत्यू जिव्हारी लागल्याने आई वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या
फोटो मिळाले की देतो.
२५१९५
मुलीच्या विरहाने दांपत्याची आत्महत्या
राजेवाडीतील घटना; जेवणात घास अडकल्याने मुलीचा झाला होता मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
आटपाडी/दिघंची, ता. १ ः पोटच्या दोन वर्षांच्या मुलीचा घशात घास अडकून झालेला मृत्यू सहन न झाल्याने राजेवाडी (ता. आटपाडी) येथील दांपत्याने एकाच दोरीने गावातील मंदिराच्या आवारात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. करण नाना हेगडे (वय २८) व शीतल करण हेगडे (२२) असे मृत दांपत्याचे नाव आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी, की राजेवाडी येथील करण हेगडे हा तरुण पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करीत होता. पत्नी व दोनवर्षीय मुलीसह तो पुण्यात राहत होता. त्यांना मुलगी एकुलती एक होती. ती दोघांचीही लाडकी होती. पाच दिवसांपूर्वी लहान मुलगी जेवण करीत असताना तिच्या घशात घास अडकला होता. घशात अन्नाचा खास अडकून श्वासोच्छ्वास बंद होऊन आई-वडिलांच्या समोरच मुलीचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना दोघांच्याही जिव्हारी लागली होती. मुलीचा मृतदेह घेऊन ते गावी आले होते. गावात अंत्यसंस्कार करून तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन केले.
तीन दिवस दोघेही प्रचंड अस्वस्थ होते. चौथ्या दिवशी घरात कोणालाही काहीही न सांगता गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील कान्होबा मंदिर गाठले. तेथे मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन दोघांनीही जीवनयात्रा संपवली. घरांत दोघेही नसल्याची माहिती झाल्यावर शोधाशोध केल्यावर ही घटना माहिती झाली. करणच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात, ‘आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. आम्ही आमच्या इच्छेने आत्महत्या करत आहोत. बाळा, आम्ही तुझ्या भेटीला येत आहोत,’ असा मजकूर लिहिला आहे. अवघ्या चार दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Atp22b03118 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..