पावसाने मारले, दूध बिलाने तारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने मारले, दूध बिलाने तारले
पावसाने मारले, दूध बिलाने तारले

पावसाने मारले, दूध बिलाने तारले

sakal_logo
By

पावसाने मारले, दूध बिलाने तारले
शेतकऱ्यांची दिवाळी गोड; १० ते ३० टक्क्यांपर्यंत बोनस वाटप
दत्तात्रय वारके : सकाळ वृतसेवा
बिद्री, ता. २३ : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा फटका शेती व्यवसायाला बसत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भात, भुईमूग, ज्वारी, गहू या पिकांपाठोपाठ जिल्ह्याचे नगदी पीक असलेली ऊस शेतीही यामुळे संकटात आली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वीकारलेला दुग्ध व्यवसायच आता त्यांच्यासाठी तारणहार ठरत आहे. प्रमुख दूध संघ आणि प्राथमिक संस्थांकडून उत्पादकांना यंदा १० ते ३० टक्क्यांपर्यंत बोनस वाटप केल्याने त्यांचीही दिवाळी गोड झाली आहे.
शेतीमध्ये केलेला खर्चही मिळणाऱ्या उत्पन्नातून भागत नसल्याने नको ती शेती म्हणण्याची आणि शेती सोडून देण्याची मानसिकता शेतकऱ्यांत दिसून येत आहे. यामुळेच तरुण पिढी शेती व्यवसायाकडे वळत नसल्याचे वास्तव आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय अनेक वर्षांपासून खेडोपाडी सुरू आहे. आजही शेतकऱ्यांच्या गोठ्यात किमान दोन-तीन दुधाळ जनावरे हमखास पाहायला मिळतात. गाय, म्हैस यांच्यापासून मिळणारे दूध गावच्या प्राथमिक दूध संस्थांना घातले जाते. हे दूध जिल्ह्यातील प्रमुख दूध संघ गोळा करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवितात. यातून दर दहा दिवसाला दूध बिल उत्पादकांच्या हातात मिळते, तर वर्षातून एकदा दूध फरक बिल, लाभांश संस्थांकडून त्यांना मिळतो.
यंदा प्रमुख दूध संघ आणि प्राथमिक दूध संस्थांकडून उच्चांकी फरक बिल मिळाल्याने खऱ्या अर्थाने उत्पादकांची दिवाळी गोड झाली आहे. काही ठिकाणी १० ते ३० टक्क्यांपर्यंत बोनस वाटप केला आहे, तर काही संस्थांनी एकूण दूध संकलनाला प्रत्येकी तीन रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत दर दिला आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात दिवाळीची खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना ग्रामीण भागात मात्र या सणाची धामधूम सुरू आहे.
-----------------
कोट
दूध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय असून, तो ग्रामीण अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनत आहे. सुशिक्षित तरुणांनी या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास हा व्यवसाय निश्चितच फायदेशीर ठरत आहे. ‘गोकुळ’दूध संघातर्फे याबाबत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
- नविद मुश्रीफ, संचालक गोकुळ दूध संघ
---------------
चौकट
सव्वा लाखांपर्यंत बोनस
प्रत्येक महिन्याच्या ३, १३ आणि २३ तारखेला दूध उत्पादकांना दहा दिवसांचे दूध बिल रोखीने दिले जाते, तर दिवाळीला तीन रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत प्रतीलिटर बोनस दिला जातो. यातून किमान पाच हजारांपासून ते सव्वालाख रुपयांपर्यंत बोनस मिळाल्याची उदाहरणे गावागावांत आहेत..