शेतमालाचा दर शेतकऱ्यानेच ठरवावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतमालाचा दर शेतकऱ्यानेच ठरवावा
शेतमालाचा दर शेतकऱ्यानेच ठरवावा

शेतमालाचा दर शेतकऱ्यानेच ठरवावा

sakal_logo
By

00902
भेडसगाव : येथे ऊसदर जनजागृती सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जय शिवराय किसान संघटनेचे पदाधिकारी.

शेतमालाचा दर शेतकऱ्यानेच ठरवावा
शिवाजी माने; भेडसगावात ऊसदर जनजागृती सभा
भेडसगाव, ता. ७ : ऊस पिकवण्यासाठी लागणाऱ्या खतांचे, तणनाशकांचे, कीटकनाशकांचे, बी- बियाण्यांचे, मशागतीचे दर अगोदरच ठरवलेले असतात; मग स्वतःच्या जमिनीत उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा दर ठरवायचा अधिकार मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केले. ते भेडसगाव येथे झालेल्या ऊसदर जनजागृती सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी अप्पासाहेब साळुंखे होते.
माने म्हणाले, ‘‘कोणत्याही कारखान्यात निर्माण होणाऱ्या वस्तूसाठी लागणारा कच्चा माल खरेदी करत असताना त्याचे दर अगोदरच ठरवलेले असतात. हा बाजारात चालत असलेला सर्वमान्य व्यवहार आहे. याप्रमाणेच साखर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ऊस आहे, मग या कच्च्या मालाची किंमत अगोदर ठरवायला हवा. आजपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांनी उसदराचे घोंगडे भिजतच ठेवले आहे. सद्य:स्थितीत कारखानदार असो वा शासन, दोन्हीही बाजारातील साखरेच्या दरावरच आम्हाला उसाचा दर देत आलेले आहेत. हा पायंडा बंद करण्यासाठीच ‘नको एफ आर पी, हवी एम आर पी’ हे अभियान राबवत आहे.’’
मौजे डिग्रजचे उदय पाटील यांनी, सरकारी नोकर ज्याप्रमाणे एकत्र येऊन, सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतात, तसेच सर्व शेतकऱ्यांनी गावातील आपले गट, तट, वाद, पक्ष, जातिभेद बाजूला ठेवून ऊस दराच्या प्रश्नासाठी सांगली जिल्ह्यात होणाऱ्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
मराठा महासंघाचे जिल्हा प्रवक्ते अनिल पाटील, शितल कांबळे, तसेच जिद्द कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सुतार यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी ओंकार यादव, शिरीष पाटील, प्रवीण पाटील, गंगाराम तांबे, भीमराव फाळके, शुभम पाटील, प्रकाश देसाई, मानसिंग कांबळे आदींसह जय शिवरायचे राजाराम थोरवत, बजरंग अवघडे, महेश मोहिते व शेतकरी उपस्थित होते. डॉ. सुभाष पाटील यांनी स्वागत केले, तर अनिल पाटील यांनी आभार मानले.