जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना उन्हाळी नाचणी व वरीची भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना उन्हाळी नाचणी व वरीची भुरळ
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना उन्हाळी नाचणी व वरीची भुरळ

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना उन्हाळी नाचणी व वरीची भुरळ

sakal_logo
By

99761
किसरूळ (ता. पन्हाळा) : येथील गणपती पाटील यांच्या नाचणी प्लाॕटला जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी भेट दिली.

उसाला पर्याय म्हणून नाचणी, वरीचे उत्पादन घ्या : जिल्हाधिकारी रेखावार
बाजार भोगाव, ता. २९ : उसाला पर्याय म्हणून नाचणी व वरी पिकांचे उत्पादन घ्यावे. त्यांच्या खरेदी-विक्रीसाठी लवकरच केंद्र स्थापन करू, या पिकांबरोबरच शेतकऱ्यांनी सूर्यफुल बियाणे निर्मिती, मध व रेशीम व्यवसाय करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले.
पन्हाळ्यातील बाजारभोगाव, किसरूळ, काळजवडे, पिसात्री येथील शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये प्रथमच उन्हाळी नाचणी आणि वरीच्या उत्पादनाचा प्रयोग राज्यात सर्व प्रथम यशस्वी करून दाखवला. त्यामुळे सध्या परिसरातील ३८ शेतकऱ्यांनी २३ एकर क्षेत्रात नाचणी, तर दोन एकर क्षेत्रात वरीची लागवड केली आहे. २०२३ हे ‘जागतिक लघु तृण धान्य वर्ष’ म्हणून साजरे केले जात असताना पौष्टिक असलेल्या या पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शिवार फेरीसाठी निमंत्रण दिले होते. या पार्श्‍वभूमीवर आले असता ते बोलत होते.
रेखावार यांनी पायवाट तुडवून नाचणी व वरीच्या शेतीची पाहणी केली. त्यांनी शेतातच बसून नाचणीची भाकरी, आंबील, भाजी, खर्ड्याचाही आस्वाद घेतला. किसरूळ येथील गणपती संभाजी पाटील यांच्या नाचणी व वरीच्या प्लाॕटला भेट दिली. सर्जेराव पाटील, मिलिंद पाटील व गणपती संभाजी पाटील यांच्याकडून पिक लावणी ते काढणी प्रक्रिया समजावून घेतली. काळजवडे येथील प्रकाश आनंदा पाटील यांच्या प्लाॕटलाही भेट दिली. नाचणी व वरीसाठी स्थानिक पातळीवर खरेदी विक्री केंद्र, गव्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या.
तालुका कृषी अधिकारी डी. एस. शिंगे, ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक नासिर इनामदार, आर. एस. चौगले, व्ही. ए. पाटील, मधुकर कुंभार, फुलसिंग आडे, गणपती सादू पाटील, रामचंद्र पाटील, सचिन पाटील, कृष्णात पाटील, संभाजी पाटील, केशव मुगडे, शामराव पाटील, प्रकाश पाटील, ग्रामसेवक वाघमारे, राम जोशी, भिकाजी पाटील, सुभाष सावंत उपस्थित होते.