बनावट सोने तारण ठेवून बॅंकांना फसवणारी टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट सोने तारण ठेवून  बॅंकांना फसवणारी टोळी जेरबंद
बनावट सोने तारण ठेवून बॅंकांना फसवणारी टोळी जेरबंद

बनावट सोने तारण ठेवून बॅंकांना फसवणारी टोळी जेरबंद

sakal_logo
By

फोटो : nip०८२८---KOP२२L६११६७
ओंकार दबाडे, चंदू चोरगे, सुहास मोहिते, गणेश घोडके, पप्पू जंगीड, अमोल पोतदार, गौसपाक जमादार


बनावट सोने तारण ठेवून
बॅंकांना फसवणारी टोळी जेरबंद
सदलगा, चिक्कोडी पोलिसांची कारवाई, संशयित कोल्हापूर, इचलकरंजीतील

चिक्कोडी, ता. ८ ः बनावट सोने तारण ठेवून बॅंकांकडून कर्ज उचलणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात सदलगा, चिक्कोडी पोलिसांना यश आले. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अमोल गणपती पोतदार (रा. कोल्हापूर), पप्पू मदनलाल जांगीड (रा. जयपूर-राजस्थान), ओंकार चंद्रकांत दबाडे, गणेश नेमीनाथ घोडके, चंदू चोरगे, गौसपाक अब्दुलरजाक जमादार (सर्वजण रा. इचलकरंजी), सुहास सत्याप्पा मोहिते (रा. कोल्हापूर), फरीद अब्दुल मकानदार (रा. अथणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बिरेश्र्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या भोज येथील शाखेत दादासाहेब दत्तू तिलक (रा. भोज) याने बनावट सोन्याला हॉलमार्क लावून खरे सोने असल्याचे दाखवून २ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतल्याची फिर्याद शाखा व्यवस्थापकाने सदलगा पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी याचा तपास सुरू केला असता यामागे टोळी असल्याचे उघड झाले. पहिल्यांदा कोल्हापूर येथील पोतदार व जयपूर येथील पप्पू जांगीड यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वरील आणखी सहा जणांची नावे पोलिसांना सांगितली. या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी तपासात पुढे येत आहेत. यापूर्वी अनेक बॅंकांना त्यांनी बनावट सोने देऊन फसवणुकीचा प्रयत्न केला असून काही बॅंकांची फसवणूकही केली असल्याचे उघड झाले आहे.
या आठ संशयितांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तर भोज येथे सोने तारण ठेवलेले व्यक्ती तिलक याचा यामध्ये सहभाग आहे की नाही, याचा तपास सुरू असल्याची माहिती सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भरतगौडा यांनी दिली. पोलिस उपाधीक्षक बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदलगा ठाण्याचे उपनिरीक्षक भरत एस., चिक्कोडीचे उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, प्रवीण बिळगी यांच्यासह सहकारी के. एन. यळीगार, एस. एम. बडोदे, एम. ए. पडतारे, एम. पी. सत्तीगेरी, आर. एल. शिळनवर, एस. पी. गलगली, आर. आर. करीगार यांनी तपास करून संशयितांना जेरबंद केले.
सदलगा व चिक्कोडी पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जयपूर व कोल्हापूर येथील दोघांना सदलगा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर इतर सहा जणांना चिक्कोडी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.
या प्रकरणाचा तपास करताना बोरगाव येथील जनता को-ऑप. क्रेडिट सोसायटी, मांगूर येथील भैरवनाथ सोसायटी, हेब्बाळ येथील अर्बन सोसायटी, रायबाग येथील कर्नाटक सोसायटी, चिक्कोडी येथील एचडीएफसी बॅंक, चिक्कोडी येथील एमएजी फायनान्स, चिक्कोडी येथील आयसीआयसी बॅंक, बैलहोंगल येथील अॅक्सिस बॅंक, निपाणी येथील अॅक्सिस बॅंक, भोज येथील बिरेश्र्वर सोसायटी अशा संस्था व बॅंकांना अशा प्रकारची फसवणूक केली असल्याचे पोलिस तपासात उघड होत असून, आणखी तपास सुरू आहे.