
पवारांचा पुन्हा समितीशी संवाद
पवारांचा पुन्हा
समितीशी संवाद
बेळगाव, ता. ७ : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पुन्हा मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. तसेच, महाराष्ट्रातील खासदारांना सीमाप्रश्नाबाबत संसदेत आवाज उठवण्याची सूचना केली आहे.
सीमाभागात तीन-चार दिवसांपासून कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संघटनांनी मंगळवारी (ता. ६) राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य केले होते. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकाने महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नये, तसेच मराठी भाषिकांचा संयम सुटला तर जे काही होईल, त्याला सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील, असा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर श्री. पवार यांनी तातडीने समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती घेतली होती. त्यानंतर आज दुपारी पुन्हा समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे त्यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली. या वेळी मरगाळे यांनी कर्नाटक सरकारकडून कशा प्रकारे दडपशाही केली जात आहे, याची माहिती त्यांना दिली.
त्यासंदर्भात श्री. मरगाळे म्हणाले, ‘‘पवार यांनी महाराष्ट्रातील खासदारांना लोकसभा व राज्यसभेत याबाबत आवाज उठवण्याची सूचना केली आहे. गरज पडल्यास बेळगावात येऊन समिती कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. पवार यांचे सीमा लढ्यात महत्त्वाचे योगदान असून, संपूर्ण सीमाप्रश्नाची जाणीव असलेले ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. त्यांनी सातत्याने समिती कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. त्यामुळे समितीचे नेते सीमा प्रश्न आवश्यक असलेली माहिती आणि समस्या त्यांच्याकडे मांडत असतात.’’