
कोगनोळी येथील बोरपाडळेचा तरुण अपघातात ठार
१७०९
चोरीला गेलेली दुचाकी
त्यालाच घेऊन गेली...
कोगनोळी येथे अपघातात बोरपाडळेचा तरुण ठार
सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. १ : आपली चोरीला गेलेली दुचाकी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यातून चौकशी करून गावाकडे परतताना कोगनोळी (ता. चिकोडी) येथे झालेल्या अपघातात बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील शक्तीकुमार भिवाजी कुंभार (वय ३२) जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी झाला. याबाबत निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत माहिती अशी, शक्तीकुमार पेठवडगाव येथे हॉटेलमध्ये मॅनेजर होता. काही दिवसांपूर्वी त्याची दुचाकी चोरीला गेली होती. चोरीच्या दुचाकी निपाणी ग्रामीण पोलिसांनी पकडल्याची माहिती त्यांना मिळाली होती. चोरीला गेलेली दुचाकी मिळेल या आशेने ते प्रतीक दिलीप रसाळ (वय ३४, रा. पेठवडगाव) या मित्रासोबत निपाणीला गेले होते. कोगनोळी टोलनाक्याजवळ प्रसाद नर्सरीजवळ आडवे आलेल्या कुत्र्याला दुचाकीची जोराची धडक बसली. या धडकेमुळे रस्त्यावर पडलेल्या शक्तीकुमार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. प्रतीक रसाळ जखमी झाले. घटनास्थळी कोगनोळी पोलिस ठाण्याचे बीट हवालदार राजू गोरखनावर, शिवप्रसाद व अन्य पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
विशेष म्हणजे त्याची दुचाकी मिळाली नाही; पण गावाकडे परतताना त्याच्यावर काळाने घाला घातला. गरीब परिस्थितीतून शिकत हॉटेल अन् इतर व्यवसायामध्ये नशीब अजमावत होता. एकुलता असल्याने घरची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या मागे पत्नी, ३ वर्षांचा मुलगा, आई - वडील असा परिवार आहे.
..................................
दुसरा आघात
दोनच महिन्यांपूर्वी बोरपाडळेतील कुंभार परिवारातील ऋतुराज याचा अपघाती मृत्यू झाला होता. शक्तीकुमारच्या अपघाती निधनाने कुंभार परिवारावर दुसऱ्यांदा आघात झाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01607 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..