
माले येथील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
माले येथील शेतकऱ्याचा
उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय
बोरपाडळे, ता. २९ : माले ( ता.पन्हाळा) येथील महादेवनगर (चांदोली वसाहत) येथील शेतकऱ्याचा शेतातील काम आटपून चालत घरी येत असताना उष्माघाताने चक्कर येऊन जागीच मृत्यू झाला. पांडुरंग महादू पेजे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या दरम्यान शहापूर गावाजवळ घडली.
पेजे हे सकाळी शहापूर येथे शेती कामासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून चालत घरी परत येत असताना बोरपाडळे - कोडोली रस्त्यावरील शहापूरजवळील केकरे मळा भागात आले असता त्यांना कडक उन्हामुळे अस्वस्थ वाटून अचानक चक्कर आली. रस्त्यालगत असणाऱ्या चरीमध्ये कोडोली पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कोडोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.