
२०८ वर्षांची परंपरा चांदे येथील दींडीने पंढरपूरला केले प्रस्थान
....
2106,2108,2107
...
मुकुंद महाराज चांदेकर यांच्या
पायी दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान
---
२०८ वर्षांची परंपरा; वारकऱ्यांच्या भजनाने वातावरण विठ्ठलमय
धामोड, ता. २१ ः टाळ-मृदंगाचा गजर करीत चांदे (ता. राधानगरी) येथील सदगुरू ब्रह्मीभूत मुकुंद महाराज चांदेकर यांच्या पायी दिंडीने २०८ वर्षांची परंपरा सुरू ठेवत आज सहाव्या पिढीने माघी एकादशी यात्रेसाठी पंढरपूर यात्रेला प्रस्थान केले. ३०० हून अधिक वारकऱ्यांच्या भजनाने सारे वातावरण विठ्ठलमय झाले होते.
मुकुंद महाराजांनी २०० वर्षांपूर्वी या दिंडीची स्थापना केली. त्यांच्या मागे रामजी महाराज, हरी महाराज, केशव महाराज, वसंत महाराज यांनी दिंडीची परंपरा सुरू ठेवली. त्यानंतर माऊली महाराज आणि निवृत्ती महाराज या बंधूंनीही पाचव्या पिढीपर्यंत लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाला दिंडी नेली. आता त्यांचा वसा आणि वारसा त्यांचे पुत्र म्हणजे सहाव्या पिढीतील हक्कदार हरी महाराज आणि सोपान महाराज यांनी या दिंडीची पताका आपल्या खांद्यावर घेतली आहे. माघ शुद्ध एकादशीला म्हणजेच माघी एकादशीला या दिंडीला पंढरपुरात प्रथम मानाचे स्थान असते. आज सकाळी चांदे येथील मुकुंद महाराजांच्या समाधीस्थळावर भजन, आरती झाल्यावर विठ्ठलाच्या भेटीची आस धरत वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गावातून आणि राशिवडे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. राशिवडे येथे सरपंच संजीवनी पाटील व सदस्यांनी दिंडीचे स्वागत केले.
...
मला २५ वर्षांपासून ५० वेळा पायी दिंडीतून जाण्याचे भाग्य मिळाले आहे. सध्या माझे वय ८१ असले तरी हरिनामामुळे मला कुठलाही त्रास नाही. दिंडीच्या पुढे जाऊन जेवण करण्याचे काम करीत होतो. या दिंडीच्या पाचव्या पिढीपासून मला जाण्याचा योग मिळाला. यातच मला आनंद वाटतो आहे.
- पांडुरंग गुंडू पाटील, राशिवडे
....
गेली १५ वर्षे मी या दिंडीतून अनवाणी पंढरपूरपर्यंत जात आहे. मी व्यवसायाने डॉक्टरी पेशातला असून, दिंडीत जाता-येता मी गेली १५ वर्षे मोफत रुग्णसेवा करतो आहे. या सेवेतून मला एक वेगळाच आनंद, समाधान मिळते.
- डॉ. सर्जेराव गुरव, घानवडे