
स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थी घडवणारी शाळा
01294
गुडेवाडी : शालेय स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांसमवेत.
स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थी घडवणारी शाळा
विद्यामंदिर गुडेवाडी; ८ वर्षांत ३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, दोघांची नवोदयला निवड
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : गुडेवाडी (ता. चंदगड) येथील मराठी शाळेने विविध शालेय स्पर्धेत गुणवंत विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणून राज्य पातळीवर लौकीक प्राप्त केला आहे. गेल्या आठ वर्षांत ३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. दोघांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. प्रज्ञाशोध परीक्षेत चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर, तर २५ विद्यार्थी तालुका स्तरावर चमकले. ब्रेन डेव्हलपमेंट सर्च परीक्षेत १८ विद्यार्थी पात्र ठरले. मंथन परीक्षेत तीन वर्षांत तीन विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर, तर २८ विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर यश मिळवले. शाळा सिद्धी उपक्रमात आघाडीवर असणारी शाळा म्हणूनही नाव घेतले जाते.
शाळेची स्थापना १९३८ साली झाली. पहिली ते सातवीच्या या शाळेची पटसंख्या २०४ आहे. शिक्षकांनी २०१४ पासून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन सुरू केले. त्याला विद्यार्थ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला. केवळ शिष्यवृत्तीच नव्हे, तर शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत कामगिरी दाखवली. आता या शाळेची ही परंपराच बनली आहे. लोकसहभागातून विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, ॲण्ड्रॉईड टीव्ही व इतर अनुषंगिक साहित्य आहे. इमारतीची रंगरंगोटी केल्यामुळे अध्ययन आणि अध्यापनाचा उत्साह वाढण्यास मदत झाली आहे.
शाळेला मिळालेले पुरस्कार
- स्वच्छ, सुंदर, हिरवी शाळा सन २०१७
- राजर्षी शाहू सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम केंद्रात प्रथम
- राजर्षी शाहू शिक्षण समृद्धी कार्यक्रम
- उपक्रमशील शाळा तालुक्यात प्रथम
- माझी समृद्ध शाळा केंद्रात प्रथम २०१८-१९
शाळेच्या जडणघडणीमध्ये अनंत धोत्रे, रमेश गावडे, बाबू परीट यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षकांचे प्रामाणिक काम आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांचेही सहकार्य आहे.
- दत्तात्रय कांबळे, मुख्याध्यापक.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी शाळेच्या उन्नतीसाठी एकत्रीत प्रयत्न केल्यास शाळेचा कायापालट होऊ शकतो. आमच्या छोट्या गावाने हे सिद्ध केले आहे.
- गजानन कोकीतकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.
Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01852 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..