चंदगडला दोन हजार हेक्टरवरील भात कुजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला दोन हजार हेक्टरवरील भात कुजले
चंदगडला दोन हजार हेक्टरवरील भात कुजले

चंदगडला दोन हजार हेक्टरवरील भात कुजले

sakal_logo
By

01565
कोरज : ताम्रपर्णीच्या पुराने नदीकाठचे पीक असे कुजून गेले आहे.

चंदगडला दोन हजार हेक्टरवरील भात कुजले
ताम्रपर्णी, घटप्रभेकाठी नुकसान; दरवर्षीच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल, भरपाईची मागणी
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २२ : महापूर आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नदीकाठच्या सुमारे दोन हजार हेक्टरहून अधिक भातपिकाचा चिखल झाला आहे. इथे दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे. काही ठिकाणी मळका टाकून पीक घेण्याची धडपड शेतकरी करीत आहेत; परंतु २०१९ नंतर सातत्याने नदीकाठ पाण्याखाली जात असून त्यामुळे दरवर्षी नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
नदीकाठची सुपीक शेती, अशी शेती असणारा शेतकरी सधन समजला जातो; परंतु गेल्या चार वर्षांत महापुराने नदीकाठच्या शेतकऱ्यांची पार दैना उडवली आहे. या शेतीत विशेषतः भात आणि उसाचे पीक घेतले जाते. उसाचे पीक उंच वाढलेले असल्याने किमान प्रकाश संश्लेषण होत असल्याने ते तगून राहते; मात्र भाताचे पीक पाण्याखाली जाते. पुराचे पाणी आठ-दहा दिवस उतरले नाही तर त्याचा चिखल होतो. शेत तयार करण्यापासून बियाणे, लागवड, मशागत, खतावर झालेला खर्च पाण्यात जातो. नव्याने पीक लागवड करायची म्हटले तर तरवा उपलब्ध नसतो. मळका टाकून पीक घ्यावे लागते. त्यातून अपेक्षित उत्पादन येत नाही. नव्याने मशागतीवर खर्च होतो. एकूण खर्च आणि उत्पादन याचा विचार करता शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. शासनाकडून मिळणारी भरपाई अत्यल्प आहे. त्यासाठी कागदी घोडे नाचवताना शेतकऱ्याच्या नाकीनऊ येतात. शिवाय अतिवृष्टी झाली होती का, याचा विचार करून भरपाईची निश्चिती केली जाते. मुळात कोकण भागात अतिपाऊस झाला की, नदीला महापूर येतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पावसाचे प्रमाण कमी होत जाते. पश्‍चिमेकडील अतिवृष्टीचा परिणाम पूर्वेकडील भागावर अधिक होतो. पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने नदीपात्रातील पाणी शिवारात पसरते आणि जास्त दिवस पूर राहिल्यास पिके कुजतात. महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई देऊन दिलासा देणे गरजेचे आहे.
---------
कोट
महसूल विभागाने महापुराने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे. दरवर्षीच्या नुकसानीने शेतकरी मेटाकुटीला आले असून शासनाने आधार न दिल्यास नदीकाठची जमीन पडीक बनेल अशी भीती आहे.
- नितीन पाटील, बळीराजा शेतकरी संघटना.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02003 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..