गुडेवाडीतील शिक्षकाचा पर्यावरणपुरक मूर्तीचा ध्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुडेवाडीतील शिक्षकाचा पर्यावरणपुरक मूर्तीचा ध्यास
गुडेवाडीतील शिक्षकाचा पर्यावरणपुरक मूर्तीचा ध्यास

गुडेवाडीतील शिक्षकाचा पर्यावरणपुरक मूर्तीचा ध्यास

sakal_logo
By

01633
गुडेवाडी : स्थानिक मातीपासून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेशमूर्ती.

गुडेवाडीतील शिक्षकाचा पर्यावरणपूरक मूर्तींचा ध्यास
स्थानिक मातीचा वापर; शाळेतच बनवल्या जातात मूर्ती, समाजातून वाढता प्रतिसाद
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १ : गणेशोत्सव काळात भक्तांच्या उत्साहाला उधाण येते. दररोज घरात मनोभावे मूर्तीची पूजाही होते; परंतु विसर्जनानंतर नदीपात्रात दिसणारे हिडीस रूप, रासायनिक रंगामुळे पाणी प्रदूषण आणि पर्यावरणावर येणारा ताण यामुळे चिंतीत होणाऱ्या गुडेवाडी (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षक एल. पी. पाटील यांनी सात वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्तींचा ध्यास घेतला आहे. स्थानिक चिखलापासून बनवलेल्या रंगहीन मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करून त्यांनी इतरांपुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला अलीकडच्या काळात प्रतिसादही वाढत आहे.
अलीकडच्या काळात गणेशोत्सवाला भव्य रूप आले आहे. कारखान्यात बनवलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. सुबकता आणि सहजता यामुळे भाविक त्याकडे आकर्षित होणे साहजिकच आहे; परंतु या मूर्तींच्या विसर्जनानंतरचे रूप आणि विघटनासाठी पर्यावरणावर येणारा ताण याचा विचार करता शाडूच्या मूर्तीच योग्य ठरतात. विद्यार्थ्यांच्या मनावर हा संस्कार रुजावा म्हणून पाटील यांनी २०१६ पासून शाळेत अशा मूर्ती बनवण्यास सुरवात केली. शाळेच्या नियमित वेळापत्रकात अडथळा न करता शनिवार व रविवार हा सुटीच्या काळाचा उपयोग केला. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून माती गोळा करायची, मळायची, मूर्तीसाठी योग्य माती तयार झाल्यावर ती साच्यात घालायची, हा साचासुद्धा पाटील यांनी शाळेत उपलब्ध केला आहे. स्वतःच्या कष्टातून तयार झालेली मूर्ती पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी चमक समाधान देते. हीच मूर्ती पाटील यांच्यासह काही विद्यार्थी आपल्या घरी प्रतिष्ठापित करतात. काही विद्यार्थ्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. या उपक्रमाला हजेरी लावणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या घरी अशाच मूर्ती पूजण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, ज्या घरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात त्या शाळेच्या वतीने एकत्रित करून हौदात विसर्जित करण्यात येतात. अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून त्यांचे विघटन केले जाते. विरघळलेल्या मूर्तींची पावडर चॉकपीट म्हणून वर्षभर वापरात येते. एका शिक्षकाकडून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सुरू असलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02041 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..