विनापरवाना इंधन विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनापरवाना इंधन विक्री
विनापरवाना इंधन विक्री

विनापरवाना इंधन विक्री

sakal_logo
By

खालसा म्हाळुंगेत एकाला
लोखंडी रॉडने मारहाण
चंदगड ः खालसा म्हाळुंगे (ता. चंदगड) येथे १२ जणांनी केलेल्या मारहाणीत रामचंद्र खाचू गावडे (वय ४४, रा. खालसा म्हाळुंगे) गंभीर जखमी झाले. या प्रकरणी संशयित अर्जुन महादेव गावडे, समीर अर्जुन गावडे, गणेश अर्जुन गावडे (सर्व रा. कोलीक, ता. चंदगड) यांच्यासह नऊ अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित अर्जुन गावडे याचा मित्र सुनील पांडुरंग गावडे याने रामचंद्र गावडे यांच्या पुतणीचा फोटो मोबाईल स्टेटसवर लावला होता. या प्रकरणी गावडे यांनी सरपंच संभाजी गावडे यांची भेट घेऊन तक्रार मांडली. त्याला सोमवारी (ता. ५) ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून निर्णय घेण्याचे ठरले. त्याचा राग मनात धरून संशयित गावडे व अन्य संशयित मिळून १२ जणांनी रामचंद्र गावडे यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. गावडे यांच्याकडील पाच हजार रुपये व सोन्याची चेन घेऊन संशयित पसार झाले. हेड कॉन्स्टेबल महेश बांबळे तपास करीत आहेत.

विनापरवाना इंधन विक्री करणाऱ्यांवर गुन्हा
चंदगड ः बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर शिनोळी (ता. चंदगड) येथे विनापरवाना इंधन विक्री करणाऱ्यांवर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. टॅंकर (केए २२ सी ६३३०)मधून ही विक्री सुरू होती. यातील संशयितांची नावे समजू शकली नाहीत. कर्नाटकात इंधनाचे दर कमी आहेत. त्याचाच लाभ घेऊन संशयित टॅंकरमधून इंधन भरून विक्रीच्या उद्देशाने आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी सचिन शंकर गाडीवड्डर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे तपास करीत आहेत.

तारळेत जुगार खेळणाऱ्या
१० जणांवर गुन्हा
कसबा तारळे : येथे तीनपानी जुगार खेळणाऱ्या १० जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकत एक लाख ७२ हजार ९४० रुपयांची रोख रक्कम व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला. दहा जणांवर राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. येथील गावठाणातील युवराज खामकर यांच्या घरात तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी (ता. ३) रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकून एक लाख ३३ हजार ४४० रुपयांची रोख रक्कम व मोबाईल फोन, पत्त्याची पाने असा एकूण एक लाख ७२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तारळेसह परिसरातील अनेक ठिकाणी गौरी-गणपती सणादरम्यान दरवर्षी तीन पानी जुगार व रमीचे डाव खेळले जातात.

जाखलेत एकाची आत्महत्या
कोडोली : जाखले (ता. पन्हाळा) येथील एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद शहाजी धोंगडे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः शरद हा विवाहित असून, शेतीच्या उत्पन्नातून तो कुटुंबाची उपजीविका चालवत होता. त्याने राहत्या घरी रविवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

करनूरला २९ हजारांचा मुद्देमाल पळविला
कागल : करनूर (ता. कागल) येथील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २९ हजारांचा मुद्देमाल पळविला. या घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली आहे. सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले किरण बाजीराव पोवार यांच्या करनूर येथील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोनी कंपनीचा होम थिएटर, १२ साड्या, सोनी कंपनीचा डीव्हीडी, एअरगन व गणपतीची चांदीची मूर्ती असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02052 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..