चंदगडला बारा तास विसर्जन मिरवणुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला बारा तास विसर्जन मिरवणुका
चंदगडला बारा तास विसर्जन मिरवणुका

चंदगडला बारा तास विसर्जन मिरवणुका

sakal_logo
By

चंदगडला बारा तास विसर्जन मिरवणुका
साउंड सिस्टीमला फाटा; पारंपरिक वाद्यांना महत्त्व, गणेश भक्तांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० : शहरासह तालुक्यातील विविध गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचे शुक्रवारी (ता. ९) त्या- त्या गावांच्या सोयीनुसार ताम्रपर्णी व घटप्रभा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. या वर्षी बहुतांश मंडळांनी साउंड सिस्टीमच्या दणदणाटाला फाटा देऊन लेझीम, हलगी, बेंजो यासारख्या कर्णमधूर वाद्यांना प्राधान्य दिले. येथे दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. शेवटचा गणपती रात्री दोन वाजता विसर्जित करण्यात आला. सुमारे बारा तास विसर्जन मिरवणूक चालली. आनंदी आणि शांततेच्या वातावरणात विसर्जन पार पडले.
शहरात पाच ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्ती पुजल्या जातात. या सर्वच मूर्ती आपल्या मंडपापासून नवीन वसाहत, न्यायालय, पोलिस ठाणेमार्गे गुरुवारपेठेतून ताम्रपर्णी नदीघाटावर विसर्जनासाठी जातात. जागोजागी मूर्तीचे औक्षण करून गणेश भक्तांचे स्वागत केले जाते. परंपरेप्रमाणे जुन्या बस स्थानकामध्ये पोलिस ठाणे आणि नगरपंचायततर्फे गणेश भक्तांना मानाची पान-सुपारी दिली. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, मान्यवर मंडपात उपस्थित होते. चंदगड अर्बन बॅंक व रवळनाथ पतसंस्थेतर्फेही मानाची पान-सुपारी दिली. पारंपरिक वाद्यांबरोबरच विद्युत रोषणाई आणि फटक्यांची आतषबाजी भाविकांचे आकर्षण ठरले. चंद्रसेन गणेशोत्सव मंडळ, रामदेव गणेशोत्सव मंडळ, रवळनाथ गणेशोत्सव मंडळ, उत्कर्ष गणेशोत्सव मंडळ व साई गणेश गणेशोत्सव मंडळ या पाच मंडळांच्या मिरवणुका काही अंतराने एकापाठोपाठ होत्या. प्रत्येक मंडळाच्या पारंपरिक जागेवर श्रींच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. शहरातील सर्वात जुन्या चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे प्रथम विसर्जन झाले. त्यानंतर उत्कर्ष मंडळ, रामदेव मंडळ, साई गणेश मंडळ आणि सर्वात शेवटी रवळनाथ मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

मळवीवाडी वृक्षारोपण
मळवीवाडी : येथील हनुमान युवक मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीचे औचित्य साधून मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर झाडे लावा पर्यावरण वाचवा, असा नारा देत वृक्षारोपण केले. मंडळाचे अध्यक्ष रामलिंग पाटील, मुरारी मोहिते, बंडू पाटील, शिवाजी पाटील, जोतिबा पाटील, रवळनाथ बडसकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

सातवणेत झिम्मा-फुगडीचा फेर
सातवणे : गणेश चतुर्थीच्या सणामुळे प्रसिद्धीस आलेल्या या गावात अनंत चतुर्दशीपर्यंत घरातील गणपतीही ठेवले जातात. काल सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीच्या मूर्तींचे घटप्रभा नदीत विसर्जन केले. दुपारी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये मूर्ती विराजमान करून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक आणि महिलांनी झिम्मा-फुगडीचा फेर धरला होता. घटप्रभा नदीवरील कानडी बंधाऱ्याजवळ मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सातवणे, कानडी, केरवडे, वाळकुळी, पोवाचीवाडी, सावर्डे आदी गावांतील गणेश मूर्ती आल्यामुळे गर्दी झाली. पावसाची रीपरीप आणि नदीत उतरण्यासाठी घाट नसल्यामुळे चिखलातून मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी नेताना भाविकांना कसरत करावी लागली. लांब दोरींचा वापर करून मूर्ती नदीत नेण्यात आल्या. प्रशासनाने या ठिकाणी घाट बांधावा, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02070 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..