अथर्व दौलत सोडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अथर्व दौलत सोडणार
अथर्व दौलत सोडणार

अथर्व दौलत सोडणार

sakal_logo
By

01950 चंदगड : कामगारांसमोर बैठकीतील तपशील सांगताना प्रा. सुभाष जाधव.
----------------------------------------

‘अथर्व’चा दौलत सोडण्याचा निर्णय

बैठक निष्फळ ः आव्हान पेलण्याचा कामगार-शेतकऱ्यांचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १ : हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड कंपनी संचलित दौलत कारखान्यात आठवड्यापूर्वी दगडफेक व कामगारांना मारहाण करणाऱ्या ५९ कामगारांना निलंबित केले आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या मुद्द्यावर कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी असमर्थता दर्शवली. त्याच मुद्द्यावरून कामगार संघटना, शेतकरी आणि अथर्व प्रशासन यांच्यात झालेली आजची बैठक निष्फळ ठरली. खोराटे यांनी आपण हताश झालो असून, हा कारखाना सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शेतकरी आणि कामगार यांच्यात झालेल्या बैठकीत हे आव्हान पेलण्याचे आणि कारखाना नव्या दमाने सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला.
गळीत हंगामाच्या तोंडावर कारखाना बंद असल्याने तो सुरू करण्याच्या दृष्टीने कामगार संघटना, शेतकरी, विविध पक्षाचे नेते आणि अथर्व प्रशासन यांची आज बैठक झाली. सुरुवातीलाच खोराटे यांच्या पत्नींनी २४ तारखेला कामावर हजर असणाऱ्या कामगारांना मारहाण झाल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. या स्थितीत मारणाऱ्यांची बाजू घेतली जाते; परंतु मार खालेल्यांचा विचारच केला जात नाही, अशी भूमिका मांडली. खोराटे यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून कारखाना प्रशासन चालवणे अवघड असल्याचे सांगितले.
यावर सिटू संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार यांनी आपली मते मांडली. टाळी एका हाताने वाजत नाही, त्यामुळे प्रशासन आणि कामगार यांनी एकमेकांच्या चुका पोटात घालून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे, अशी मागणी केली. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, संचालक मल्लिकार्जुन मुगेरी, तानाजी गडकरी, नितीन पाटील, पांडुरंग बेनके यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला. सुमारे दोन तास विविध मुद्द्यावर दोन्ही बाजूंकडून घमासान चर्चा झाली. अंतिमतः खराटे यांनी आपली भूमिका मांडताना ५९ कामगारांना वगळून उद्या कारखाना सुरू करतो, अन्यथा आपल्याला ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले. माझी जेवढी गुंतवणूक झाली आहे तेवढे पैसे कोणीही द्यावे, कारखान्याची चावी त्यांच्या हातात देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, ॲड. संतोष मळवीकर आदी उपस्थित होते.
त्यानंतर कामगार, शेतकरी यांची बैठक झाली. प्रा. जाधव यांनी चर्चेचा तपशील त्यांच्यासमोर मांडला. खोराटे यांनी कारखाना सोडण्याचे स्पष्ट केले असून आता हे आव्हान शेतकरी, कामगारांना पेलावे लागेल, असे सांगितले. त्यादृष्टीने नियोजनपूर्वक पावले उचलण्याचे आवाहन केले. शिवानंद हुंबरवाडी, शंकर मनवाडकर, सुधाकर पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. कारखाना चालवण्याचे आव्हान पेलण्याचा निर्धार करण्यात आला.