नुकसानीच बॅंक, अथर्व जबाबदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसानीच बॅंक, अथर्व जबाबदार
नुकसानीच बॅंक, अथर्व जबाबदार

नुकसानीच बॅंक, अथर्व जबाबदार

sakal_logo
By

शेतकऱ्यांच्या नुकसानीस केडीसीसी, अथर्व
कंपनी जबाबदार राहिलः भरमूअण्णा पाटील

चंदगड, ता. २ ः दौलत कारखान्याच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागण केली. वर्षभर काबाडकष्ट आणि आर्थिक गुंतवणूक करून पीक उभे केले. ऐन तोडणीवेळी कारखाना बंद होत असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बॅंक, अथर्व कंपनीची असेल, असा इशारा माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी दिला.
पाटील म्हणाले, ‘दौलत कारखाना हा सभासदांच्या त्यागातून उभारला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सिक्युटरायझेशन अॅक्टखाली तो अथर्व कंपनीला चालवायला दिला आहे. तो बंद पडणार नाही, याची जबाबदारी या दोन्ही घटकांची आहे, परंतु काहीतरी कारण काढून तो बंद ठेवला जात असेल तर शेतकऱ्यांच्या नुकसानीस तेच जबाबदार राहतील. कारखाना स्थापन करणाऱ्या संचालकांपैकी केवळ आपण हयात असून, त्यावेळी काय कष्ट पडले, याची जाणीव आपल्याला आहे. तो बंद पडला तर त्याच्या सर्वाधिक वेदना आपल्यालाच होतील. प्रशासन आणि कामगारांतील वाद मिटवण्याबाबत सहभाग घेतला असता; परंतु आपल्याला तसे निमंत्रणच दिले नाही. तरीही जबाबदारी म्हणून दोन्ही घटकांनी एकत्र बसून संवादातून हा प्रश्न मार्गी लावावा व कारखाना सुरू करावा, अशी भूमिका मांडली होती.’
कारखान्यासभोवती पंधरा किलोमीटरच्या परिसरात पाच लाखांहून अधिक उसाची उपलब्धता आहे. हा सर्व ऊस बैलगाडीने कारखान्याकडे येतो. कारखाना बंद राहिल्यास एवढ्या मोठ्या उसाची जबाबदारी कोण घेणार, त्याचे वेळेत गाळप न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कोण सोसणार असाही प्रश्न त्यांनी केला. जिल्हा बॅंकेने या प्रश्नात पुढाकार घेऊन हा कारखाना अथर्वकडून कसा सुरू केला जाईल, याचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.